संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारने मनापासून केला, पण...; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:23 PM2023-03-14T12:23:06+5:302023-03-14T12:24:45+5:30
राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अत्यावश्यक सेवेतील अनेकांचे हाल होत आहेत.
मुंबई - जुन्या पेन्शनसाठी आम्ही सरकारला अनेक निवेदने दिली. चर्चाही खूप झाल्या आहेत. पण कोणताही अंतिम निर्णय सरकरने केला नाही. कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळेच राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात असल्याची घोषणा कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी येथे केली. या संपात शासकीय रुग्णालये, शाळा, कॉलेज, नगरपालिका, जिल्हा परिषद, म्हाडा, तहसीलदार कार्यालये यासह अनेक सरकारी कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. आजपासून या संपाचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळेच, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अत्यावश्यक सेवेतील अनेकांचे हाल होत आहेत. त्यातूनच अजित पवार यांनी पाँईट ऑफ इन्फॉरमेशन अंतर्गत प्रश्न उपस्थित केला. जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे, अत्यावश्यक सेवेवर त्याचा परिणाम झालाय. काही हॉस्पीटलमध्ये स्टाफ आलेला नाही. सरकारने संघटनेसोबत चर्चा केली, पण त्यातून मार्ग निघाला नाही. अध्यक्ष महोदय, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा संप झाल्यास जनतेचे हाल होतात. त्यामुळे, सरकारने तातडीने आंदोलनप्रश्नी मार्ग काढवा, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली. तसेच, आंदोलन मागे घेण्याबाबत सरकारची भूमिका काय, असाही सवाल पवार यांनी विचारला.
दरम्यान, राज्य सरकारने या संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचारी संघटनांची बैठक घेतली होती. राज्य सरकारने तोडगा काढण्याचा मनापासून प्रयत्न केला, आम्हीही त्या बैठकीला उपस्थित होतो, असेही अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.
रुग्णालयातील परिचारिका संघटनाही संपावर
जुनी पेन्शन योजना लागू करावी व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आपल्या ३४ शाखांसह आजपासून बेमुदत संपावर जात आहे. त्यांच्यासोबत तंत्रज्ञ, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारीही असल्याने रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून मेयो, मेडिकलने नर्सिंग विद्यार्थी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेणार असले तरी दोन्ही रुग्णालयाने नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.