विधानसभेतील विरोधी पक्षनेता तर आमचाच; काँग्रेस ठाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 07:02 AM2023-07-17T07:02:18+5:302023-07-17T07:02:45+5:30
पक्षश्रेष्ठींशी बोलून नाव अंतिम करणार : थोरात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेता आमचाच राहील, असा ठाम दावा काँग्रेसने केला. काँग्रेसच्या आमदारांची संख्या अधिक असल्याने विधानसभेत आमचाच विरोधी पक्षनेता असेल, असे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेता म्हणून परस्पर घोषणा केली होती. याचे पडसाद अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीत उमटले. यावर थोरात म्हणाले, काँग्रसेचे ४५ आमदार असून विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष आता काँग्रेसच आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा करणार आहोत. कोण विरोधी पक्षनेता होणार ते नाव दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बोलून अंतिम केले जाईल.
आमदार जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता : पाटील
आमच्याकडे १९ ते २० आमदार आहेत. बरेच आमदार दोन्हीकडे असल्याचे दाखवत आहेत. सर्व आमदारांची मानसिकता शरद पवार यांच्याबरोबर राहण्याची आहे. कागदावर आमचा पक्ष सर्वात मोठा आहे पण आमच्यातील ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांशी चर्चा, विचारविनिमय करावा लागेल, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले.
विधानसभेप्रमाणे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी आम्ही आग्रही आहोत. यासंदर्भात हायकमांडकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. विरोधकांतील अन्य दोन्ही पक्षांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार आहे.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस