राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची ‘लोकमत’शी बातचीत

By अतुल कुलकर्णी | Published: August 31, 2024 06:20 AM2024-08-31T06:20:29+5:302024-08-31T06:20:58+5:30

आपले तिन्ही दल कोणत्या परिस्थितीत काम करतात, याची जाणीव राजकीय विधाने करताना ठेवली पाहिजे, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

The move to impose Presidens rule in the state says congress leader prithviraj chavan | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची ‘लोकमत’शी बातचीत

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची ‘लोकमत’शी बातचीत

अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे आणि बदलापूरची घटना यामुळे सरकारच्या कार्यापद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातून निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम नौदलाकडे होते, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, नौदलाच्या कार्यपद्धतीवर अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे नौदलाचे मनोधैर्य खच्चीकरण करणारे आहे. जर नौदलाने चूक केली असेल, तर मग केंद्र सरकारने ही जबाबदारी स्वीकारावी. त्यासाठी रक्षामंत्री राजनाथसिंह यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. नौदलाने देशात भरीव कामगिरी केलेली आहे. सबमरीनसारखा उपक्रम नौदलाने राबवला. अशावेळी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे देशातल्या तिन्ही सैन्य दलासाठी अत्यंत चुकीचे आहे. आपले तिन्ही दल कोणत्या परिस्थितीत काम करतात, याची जाणीव राजकीय विधाने करताना ठेवली पाहिजे, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

मालवण पुतळा प्रकरण, बदलापूरची घटना यामुळे सरकारविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. पुतळ्यावरून राज्यभर संतप्त भावना आहेत. गेल्या शंभर वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही. त्यामुळेच जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. नौदलाला लक्ष्य केल्यामुळे नौदलात प्रचंड अस्वस्थता आहे. याची महाराष्ट्र सरकारमध्ये कोणावर जबाबदारी आहे? असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले, येणारे वेगवेगळे सर्व्हे महायुतीसाठी निराशा जनक आहेत. केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला १८० च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची. काही काळ जाऊ द्यायचा आणि वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे, अशा हालचाली सुरू असल्याची आपली माहिती असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.

...समाजात वातावरण बिघडले 
महाराजांच्या पुतळ्याचे काम कोणत्या एजन्सीला दिले होते? त्याची कागदपत्रे तातडीने जाहीर केली पाहिजेत. ज्यांनी महाराजांचा पुतळा बनवला ते कोणाच्या जवळचे होते? यावरूनही चर्चा सुरू आहे. अशा चर्चा समाजात वातावरण बिघडले आहे. त्यामुळे तातडीने या प्रकरणाची सगळी माहिती जनतेपुढे आणली पाहिजे. पुतळ्याच्या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही माफी मागितली नाही, असेही चव्हाण म्हणाले. 

१ तारखेला मविआचे आंदोलन
वेगवेगळ्या सर्वेक्षणांतून काँग्रेसला ८० जागा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ६० ते ७० जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ४५ ते ५५ जागा मिळतील, असे समोर आल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुतळा प्रकरणाची जबाबदारी तातडीने निश्चित केली पाहिजे. केवळ तेवढ्यावर न थांबता दोषींविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांचे राजीनामे घेतले पाहिजे. येत्या १ तारखेला महाराष्ट्रभर महाविकास आघाडी मालवण प्रकरणावरून मोठे आंदोलन करणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Web Title: The move to impose Presidens rule in the state says congress leader prithviraj chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.