मुंबई शहरातील मोकळ्या जागा अबाधितच राहणार; रेसकोर्स, जलाशय पुनर्बांधणीबाबत राहुल नार्वेकरांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 09:54 AM2024-03-21T09:54:48+5:302024-03-21T09:56:05+5:30
मुंबईकरांचे मत आणि हित लक्षात घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या सूचना, सल्ल्याशिवाय कोणतीही कामे होणार नाहीत, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिले.
मुंबई : मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी असो किंवा महालक्ष्मी रेसकोर्सवरील मुंबई सेंट्रल पार्कचा विकास असो, मुंबईकरांचे मत आणि हित लक्षात घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या सूचना, सल्ल्याशिवाय कोणतीही कामे होणार नाहीत, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिले.
मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी तसेच रेसकोर्सच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या विकासकामांबाबत मुंबईकरांची, पर्यावरणवाद्यांची मते जाणून घेण्यासाठी बुधवारी नार्वेकर यांनी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. त्यावेळी खुल्या चर्चेत ते बोलत होते. मोकळ्या जागा या मुंबईचा श्वास असून त्यावर कुठलेही अतिक्रमण होणार नाही, असे त्यांनी आश्वासित केले.
मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती संदर्भात बहुप्रतीक्षित असा अंतिम अहवाल ५ मार्च रोजी ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांनी सादर केला. मात्र आठ सदस्यांच्या समितीत दोन वेगवेगळे अहवाल दिल्यामुळे या विषयावरील गुंता अद्याप कायम आहे. ‘आयआयटी’च्या सदस्यांनी पर्यायी जलाशय बांधून, मग सध्याचे जलाशय रिकामे करून त्याची संरचनात्मक तपासणी आणि दुरुस्ती करण्याची शिफारस केली आहे. मात्र अन्य चार सदस्यांना ही शिफारस मान्य नाही. दरम्यान, या अहवालांवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यातच आता प्रशासनात निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार फेरबदल होणार असल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहणार आहे. दरम्यान कोणत्याही प्रकारची पुनर्बांधणी आवश्यक नसताना घातलेला घाट रद्द करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी या खुल्या चर्चेत केली.
‘रेसकोर्सवर टोलेजंग इमारतींचा विचार नाही’-
१) रेसकोर्सची जागा ही मोकळ्या भूखंडासाठी आरक्षित आहे. हे आरक्षण बदलायचे झाल्यास त्यात खूप प्रक्रिया असून त्यातही लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम किंवा खासगी विकासकाकडून इमारती उभ्या राहणार नाहीत, याबाबत मुंबईकरांनी निश्चिंत राहावे, असे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.
२) याशिवाय मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संस्था, फुटबॉल संघटना, विविध महाविद्यालयांतील खेळाडू, पोलो खेळाच्या संघटना, शालेय विद्यार्थी यांच्यासाठी रेसकोर्सच्या रचनेत कोणताही बदल होणार नसून, त्यांच्यासाठी ते नेहमी खुले राहील, असेही नमूद केले.
३) रेसकोर्सच्या जागेतील घोड्यांच्या तबेल्यांचा मुद्दाही लक्षात घेऊन त्यासाठी योग्य पाठपुरावा होईल, असेही त्यांनी सांगितले.
जलाशयाची दुरुस्तीबाबत चाचपणी करणार -
१) या पार्श्वभूमीवर आपण लवकरच पालिकेचे नवीन आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करू आणि तोडगा काढू असे नार्वेकर म्हणाले. मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीत अनेक तांत्रिक बाबींचाही समावेश आहे. त्यामुळे यावर योग्य सल्लामसलत करून, खरंच पुनर्बांधणीची आवश्यकता आहे का, की दुरुस्त्या करून सध्याचा पाणीपुरवठा सुरू ठेवला जाऊ शकतो, याची पुन्हा चाचपणी करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
२) जोपर्यंत तेथील स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी यांच्याशी सहमत होत नाहीत, तोपर्यंत कोणताही निर्णय होणार नाही, तेथील माती हलवली जाणार नाही किंवा झाडे तोडली जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.