महाराष्ट्राची हास्यजत्राफेम दिग्गज कलाकार राष्ट्रवादीत, अजित दादांनी पदही दिलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 06:26 PM2023-01-31T18:26:42+5:302023-01-31T19:04:34+5:30
प्रभाकर मोरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
मराठमोळ्या प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. सध्या सोशल मीडियावरही महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहून नेटीझन्सचं मनोरंजन होत आहे. त्यामुळे, या हास्यजत्रेतील कलाकारांचाही मोठा चाहता वर्ग तयार झाला असून ते चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आहेत. याच महाराष्ट्राचची हास्यजत्राफेम अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याहस्ते त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. यावेळी, त्यांच्यावर कोकण विभागाची जबाबदारीही देण्यात आली आहे.
प्रभाकर मोरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न यावेळी कोकण विभागीय सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदाची प्रभाकर मोरे यांची नेमणूक करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, प्रभाकर मोरे यांच्या कलेमधून नेहमी कोकणातील संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. गेल्या वीस पंचवीस वर्षाचा त्यांचा अनुभव आहे त्यांनी गावागावातून खेड्यातून शहरांमध्ये येऊन आपली कला सादर केलेली आहे. त्यामुळेच आपण त्यांना टीव्हीवर बघत असतो. आज त्यांना त्यांचे कलागुण इतरांना शिकवण्याची आवड आहे आणि त्यासाठीच त्यांची कोकण विभागात राष्ट्रवादीकडून अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
सध्या महापुरुषांचा सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. महागाई, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था, शेतकर्यांचे प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत, असेही अजित पवार यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. @AjitPawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हास्यजत्रा’ फेम सिनेअभिनेते प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. #NCP#पक्षप्रवेशpic.twitter.com/2H4RE7l1WZ
— NCP (@NCPspeaks) January 31, 2023
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रभाकर मोरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र, ते कोणत्या पक्षात जाणार हे निश्चित नव्हते. आता, ते राष्ट्रवादीचे नेते झाले आहेत.