महाऑनलाईनची व्यवस्था कोलमडल्याने नागरिकांचे हाल; शासनाने अतिरिक्त व्यवस्था सुरू करावी काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 09:44 PM2023-07-03T21:44:11+5:302023-07-03T21:54:47+5:30
...या मागणीचे पत्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आम्ही दिले आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
मुंबईत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आणि म्हाडाच्या घरांसाठी लागणारे आवश्यक दाखले व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबईतील विद्यार्थी व पालकांच्या तसेच मुंबईकर नागरिकांच्या सेतू केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाची महाऑनलाईनची व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. जरी प्रमाणपत्रे दाखल करण्यासाठी दि,१० जुलै २०२३ पर्यंत महसूल विभागाने मुदतवाढ दिली असली, या निर्णयाचे ही स्वागतच करतो. परंतू तरी देखील दाखले व प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने ही समस्या सुटेल असे वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची व नागरिकांची होणारी परवड लक्षात घेता दाखले व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासनाने अतिरिक्त व्यवस्था लवकरात लवकर सुरु करावी मुंबई काँग्रेसची मागणी आहे. या मागणीचे पत्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आम्ही दिले आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, १० वी चा निकाल लागल्यानंतर सध्या राज्यभरात अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखले व प्रमाणपत्रांची गरज लागते. शिवाय, विविध कामांसाठी राज्यातील जनतेला अधिवास, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांची गरज लागते. मात्र, महा ऑनलाइन आणि सेतू सुविधा केंद्रांच्या सर्व्हरमधील दोषामुळे ही प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. विद्यार्थ्यांची व नागरिकांची परवड सुरु आहे. त्यामुळे नुसती मुदत वाढवून भागणार नाही.त्यामुळे दाखले प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था लवकरात लवकर सुरु करावी यासाठी संबंधित विभागाला महसूल मंत्र्यांनी निर्देश द्यावेत, अशी विनंती प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.