काँग्रेसची आजची भूमिका पूर्णपणे चूकीची; नाना पटोलेंच्या आंदोलनावर राष्ट्रवादीने दर्शवली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 10:11 PM2022-02-14T22:11:47+5:302022-02-14T22:12:00+5:30
मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी काँग्रेसची आजची आंदोलनाची भूमिका पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केलाय. याबद्दल भाजपानं माफी मागावी, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं आज आंदोलन केलं.
काँग्रेसच्या आंदोलनामुळं मुंबईकरांना अनेक अडचणींना समारे जावा लागलं. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस आपलं आंदोलन तात्पूर्त मागं घेतलंय. मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये काँग्रेसने भाजपविरोधात पुकारलेले आजचे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली. भाजपाने गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच जो पर्यंत नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री माफी मागत नाही, तोपर्यंत काँग्रेसचं आंदोलन सुरुच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसच्या या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी दर्शवली आहे. मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी काँग्रेसची आजची आंदोलनाची भूमिका पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची जी भूमिका घेतली होती ती साफ चुकीचे आहे. अशाप्रकारे विरोधी पक्षांच्या घरावर मोर्चा काढणं हे योग्य नाही. असं पाऊल कुठल्याही राजकीय पक्षांनी घेऊ नये. आमचा याला साफ विरोध आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार असला तरी अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे योग्य नाही. यासाठी जागा निश्चित करून देण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी आंदोलन करायला हवेत. हे प्रत्येक पक्षाने पाळायला हवं. आता कुठे तरी या बाबतीमध्ये राजकीय पक्षांनी भूमिका घ्यायला हवी आणि अशाप्रकारे होऊ नये याची खबरदारी घ्यायला हवी, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
काँग्रेसनं देशाची माफी मागावी- देवेंद्र फडणवीस
नाना पटोलेंनी कितीही नोंटकी केली तरी काही उपयोग होणार नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट काँग्रेसनंच देशाची मागी मागितली पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.