सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 09:13 AM2024-09-22T09:13:40+5:302024-09-22T09:13:51+5:30
हायकोर्टाचा विद्यापीठाला दणका
मुंबई : मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका मंगळवारी, २४ सप्टेंबरलाच घ्या, असे आदेश देत उच्च न्यायालयाने सिनेट निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या परिपत्रकाला शनिवारी स्थगिती दिली.
राज्य सरकारने १९ सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलल्या. राज्य सरकारने दुसऱ्यांदा सिनेट निवडणुका पुढे ढकलल्याने उद्धवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. ए. एस. चांदूरकर आणि न्या. राजेश पाटील यांच्या विशेष खंडपीठाने या निवडणुका लढण्यास इच्छुक असलेले प्रदीप सावंत, मिलिंद साटम आणि शशिकांत झोरे यांच्या याचिकेवर शनिवारी सुनावणी घेतली. याआधी सिनेट निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार २२ सप्टेंबर रोजी होणार होत्या. त्या आता २४ सप्टेंबरला होतील. मतमोजणी २५ सप्टेंबरऐवजी २७ सप्टेंबरला होईल.
पुढील आदेशापर्यंत निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे. निवडणुका वेळापत्रकानुसार होतील, असे स्पष्ट करत सविस्तर आदेश नंतर देण्यात येईल, असे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आता २६ सप्टेंबरला ठेवली आहे. विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दहा जागांसाठी होणाऱ्या सिनेटच्या निवडणुका दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत.
याआधी १३ सप्टेंबर २०२३ रोजी निवडणूक घेण्यात येणार होती. मात्र, अनेक मतदारांची नावे मतदार यादीत दोनदा आल्याने आणि काहींची नावे गहाळ झाल्याने गोंधळ झाला. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली.
समितीचे काम सुरू ठेवा
१९ सप्टेंबरच्या परिपत्रकानुसार, एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याच्या निर्णयास स्थगिती दिलेली नाही. ते काम सुरू राहू शकते. त्याबाबतचा आदेश याचिकेच्या अंतिम निकालावर अवलंबून असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.