तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 06:14 AM2024-10-21T06:14:17+5:302024-10-21T06:15:09+5:30
भाजपने जाहीर केलेल्या ९९ जागांच्या यादीत मुंबईतील १३ विद्यमान आमदार आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मुंबईत वर्सोवा येथील डॉ. भारती लव्हेकर, बोरीवली येथील सुनील राणे आणि घाटकोपर पूर्व येथील पराग शाह यांचा समावेश नसल्याने हे तीन आमदार वेटिंगवर आहेत. पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे कुलाबा येथून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मलबार हिलमधून कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह वांद्रे पश्चिम येथून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची नावे आहेत.
भाजपने जाहीर केलेल्या ९९ जागांच्या यादीत मुंबईतील १३ विद्यमान आमदार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांचे मोठे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिम येथून उमेदवारी दिली आहे.
मुंबई भाजपचे सचिव विनोद शेलार २०१२ ते २०१७ नगरसेवक होते. शेलार यांच्यासमोर २००९ पासून सलग तीन वेळा विजयी झालेले काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांचे कडवे आव्हान असेल.
सहा वेळा आमदार राहिलेले मंगल प्रभात लोढा सातव्यांदा रिंगणात उतरणार आहेत. तसेच वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार, गोरेगावमधून आ. विद्या ठाकूर, विलेपार्लेमधून आ. पराग अळवणी, कांदिवली पूर्वमधून अतुल भातखळकर, अंधेरी पश्चिममधून आ. अमित साटम, दहिसरमधून आ. मनीषा चौधरी, सायन कोळीवाडा येथून कॅ. आर. तमिल सेल्वन यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तीन विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर आता चौथ्यांदा भाजपने विद्यमान आमदार योगेश सागर यांना चारकोपमधून उमेदवारी दिली आहे. पराग अळवणी आणि राम कदम (घाटकोपर पश्चिम) यांच्या उमेदवारीबाबत शंका उपस्थित होत होती. मात्र, त्यांना तिकीट मिळाले आहे.
कोळंबकर नवव्यांदा रिंगणात- वडाळा येथून कालिदास कोळंबकर नवव्यांदा निवडणूक लढविणार आहेत. ते वडाळ्यातून आठ वेळा निवडून आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून शेकापचे गणपतराव देशमुख यांनी ११ वेळा विजय मिळविला होता. तो एक विक्रम आहे.
कोटक यांचे काय?- लोकसभेला मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपकडून अखेरच्या क्षणाला तत्कालीन खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करत आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर नाराजी नाट्यही रंगले. लोकसभेत कोटेचा पराभूत झाल्यानंतर मुलुंडमधून कोटक यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना पुन्हा त्यांना धक्का देत कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे.
शेलार बंधू रिंगणात- वांद्रे पश्चिम येथून मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार तसेच मालाड पश्चिम येथून त्यांचे मोठे बंधू विनोद शेलार यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे शेलार बंधू आता निवडणुकीच्या रिंगणात असतील.