... तेव्हा बाळासाहेब अन् गोपीनाथ मुंडेंनाही वाईट वाटलं, भुजबळांनी सांगितला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 01:54 PM2023-07-05T13:54:27+5:302023-07-05T13:54:51+5:30
जी परिस्थिती निर्माण झालीय, त्याचं वाईट वाटतंय, पण यापूर्वीही अनेकदा असंच वाईट वाटल्याचे दाखलेही त्यांनी दिले.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मेळाव्यांतून आता भाषणं सुरू झाली असून दोन्हीकडून एकमेकांवर हल्लाबोल करण्यात येत आहे. पण, अजित पवार गटातील नेते आजही शरद पवार हेच आमचे विठ्ठल असल्याचे सांगत आहेत. आम्ही तुरुंगात जाऊन आलो, त्यानंतर अनेकांनी आमिष दाखवली. पण तरीही शरद पवारांसोबत आम्ही एकनिष्ठ राहिलो. पण आता हे का झाले. साहेब आमचे विठ्ठल पण या विठ्ठठलाला बडव्यांनी घेरले आहे. त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या, असे म्हणत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीतील काही नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच, जी परिस्थिती निर्माण झालीय, त्याचं वाईट वाटतंय, पण यापूर्वीही अनेकदा असंच वाईट वाटल्याचे दाखलेही त्यांनी दिले.
साहेब आम्ही गेलो ते तुमच्या भोवती जे बडवे जमलेत त्यांच्यामुळे आम्ही बाहेर पडलो. तुम्ही आवाज द्या, त्या बडव्यांना बाजूला करा आम्ही पुन्हा यायला तयार आहोत. नागालँडला परवानगी दिली मग आम्हालाही परवानगी द्या. सत्कार करा. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू. सगळ्यांनी मजबुतीने उभे राहा. कार्यकर्त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर घणाघात केला. तसेच, यापूर्वीही अनेकदा असे प्रसंग घडले आहेत.
साहेब आपण वसंतदादांना सोडलंत, तेव्हा त्यांनाही असंच वाईट वाटलं असणार. मी बाळासाहेब ठाकरेंना सोडलं, तुम्ही तेव्हा मला सांगितलं नाही की तिथंच थांबा म्हणून. ठाकरेंना पण किती वाईट वाटलं असणार. मी शिवसेना सोडली, ओबीसीच्या मुद्द्यावरुन माझे आणि बाळासाहेबांचे मतभेद झाले होते. त्यावेळी, मी शिवसेना सोडताना साहेब तुम्ही मला घेतलं. तुम्ही मला शिवसेनेत राहा असं म्हटला नाहीत. मी शिवसेना सोडली, बाळासाहेबांना सोडलं तेव्हा मलाही वाईट वाटलं. साहेब, जेव्हा धनंजय मुंडेंनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना, गोपीनाथ मुंडेंनाही तेव्हा वाईट वाटलं होतं. आज आम्हाला साहेबांना सोडताना वाईट वाटतंय, पण ही वेळ आमच्यावर का आली हाही विचार व्हायला हवं, असे म्हणत छगन भुजबळ यांनी, वेगळं होण्याची ही वेळ आपल्यावर आल्याचे स्पष्ट केले. तसेच, आता आपली माघार नाही, हेही त्यांनी दाखवून दिलं.
तेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या डोळ्यात अश्रू होते
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, १० वर्ष एकही पैसा न घेता शिवाजीराव गर्जे काम करत होते. ते इथं का आले? तिथे चाललेला कारभार, ज्यांच्यामुळे हे सगळे घडले ते यासाठी जबाबदार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना नीट वागणूक दिली जात नव्हती. शरद पवारांना वाईट वाटणे स्वाभाविक. साहेब वसंतदादांना तुम्ही सोडले तेव्हा वसंतदादांनाही असेच वाईट वाटले. मी बाळासाहेबांना माता-पिता मानत होतो. मला तुमच्यासोबत येणे भाग पाडले. तेव्हा तुम्ही मला थांबवले नव्हते. तेव्हा बाळासाहेबांनाही वाईट वाटले. धनंजय मुंडे यांना तुम्ही घेतले तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या डोळ्यातही अश्रू आले होते. हे सर्व माघारी फिरले असंही त्यांनी सांगितले.
नियुक्त्या रखडवल्या, प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक का नाही?
तुमच्यासोबत कार्यकर्ते आहेत का, जिल्हाध्यक्ष आहेत का असं म्हटलं जाते. आज इथं प्रचंड गर्दी झालीय. अत्यंत शॉर्ट नोटीस देऊन ८ हजारांहून अधिक पदाधिकारी इथं जमलेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वात नव्या दमाने, मजबुतीने पुढे वाटचाल करणार आहे. बऱ्याच नियुक्त्या व्हायच्या आहेत. काही दिवसांत त्याही होतील. मात्र तिथे वारंवार सांगून सुद्धा, शरद पवारांनी बोलूनही तिथले कारभारी नेमणुका करत नव्हते. सर्व निवडणुका घ्या, प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक घेत नव्हते. पक्ष काम कसा करणार? कार्यकर्ते नसतील तर पक्ष काम कसे करणार? मुंबईचा अध्यक्ष ६ महिने निवडला नाही. अनेक कामे रखडली होती. सांगूनही नियुक्त्या झाल्या नाहीत. हे काम होत नसेल तर मी पक्षाची जबाबदारी घेतो असं अजित पवार म्हणाले. दुसऱ्यादिवशी मीही सांगितले. पक्षात सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात. परंतु हे करायला हवे होते. १५ दिवस वाट पाहिली आणि शेवटी निर्णय घ्यावा लागला असं छगन भुजबळांनी सांगितले.