... तेव्हा गवतालाही भाले फुटतात, अमोल कोल्हेंनी करुन दिली सभेची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 12:27 PM2020-10-18T12:27:37+5:302020-10-18T12:30:35+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात एकेक बुरुज ढासळत होता. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंना भाजपने पक्षात घेतले होते.
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या दिवसाची आज (१८ ऑक्टोबर) वर्षपूर्ती. होय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सातारा येथील भर पावसातील ‘ती’ सभा राज्यातील जनतेला भावली आणि विधानसभा निवडणुकीचा नूरच पालटला. उदयनराजेंच्या साताऱ्यात उदयनराजेंचा पराभव करण्यातही या सभेनं मोठी भूमिका बजावली. तर,, सत्तेची आशा नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी महाआघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळेच, राज्यात राष्ट्रवादीचे नेते आज मंत्रिमंडळात आहेत. राष्ट्रवादीला, नेत्यांना व कार्यकर्त्यांना आज या सभेची आठवण होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात एकेक बुरुज ढासळत होता. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंना भाजपने पक्षात घेतले होते. त्यामुळे हा किल्ला राखण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार स्वत: रणांगणात उतरले. वर्षापूर्वी १८ ऑक्टोबरला सातारा जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या त्या ऐतिहासिक सभेने सर्वच राजकीय समीकरणे बदलून टाकली. या सभेच्या वर्षपूर्तीची आठवण महाराष्ट्राला होणार नसेल तर नवलच. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही तो पाऊस अन् ती सभा विसरता येणार नाही. त्यामुळेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्या सभेच्या आठवणी जागवल्या जात आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार यांच्या सभेच्या आठवणींना उजाळा दिलाय.
''दिल्लीच्या तख्तापुढे कधीही न झुकणाऱ्या स्वाभिमानी माणसांचा हा महाराष्ट्र आहे. जेंव्हा हिमालय अडचणीत येतो तेंव्हा त्याला सह्याद्रीची आठवण येते हा इतिहास आहे.पण जेंव्हा सह्याद्रीलाच आव्हानं दिली जातात तेंव्हा इथल्या गवतालाही भाले फुटतात हा देखील इतिहास आहे,'' अशी भावना कोल्हे यांनी ट्विटरवरुन व्यक्त केली आहे. सोबतच, कोल्हे यांनी शरद पवारांचा पावसातील सभेचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे आज ट्विटरच्या प्रोफाईलवरही कोल्हे यांनी पवारांचा पावसातील सभेचा फोटो लावला आहे.
दिल्लीच्या तख्तापुढे कधीही न झुकणाऱ्या स्वाभिमानी माणसांचा हा महाराष्ट्र आहे. जेंव्हा हिमालय अडचणीत येतो तेंव्हा त्याला सह्याद्रीची आठवण येते हा इतिहास आहे.पण जेंव्हा सह्याद्रीलाच आव्हानं दिली जातात तेंव्हा इथल्या गवतालाही भाले फुटतात हा देखील इतिहास आहे. pic.twitter.com/rYP2cbeAxE
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) October 18, 2020
दरम्यान, शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यात मोठी सभा झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सभेबद्दल उत्सुकता होती. पाटणमधील सभा उरकून पवारांनी साताऱ्यातील सभेच्या मैदानावर पाऊल ठेवताच पाऊस सुरू झाला; पण लोक जागचे हलले नाहीत. पवार बोलायला उभे राहिले आणि पावसाचा जोर वाढला. लोक समोर भिजत असल्याने पवारांनी डोक्यावरची छत्री बाजूला केली आणि धो-धो पावसाबरोबरच धीरगंभीर आवाजात शरद पवारही बरसू लागले. 'गतवेळी माझी चूक झाली, ती दुरुस्त करण्याचे काम सातारकरांनी करावे', असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आणि साताराच नव्हे तर, संपूर्ण राज्याचे राजकारण या सभेने बदलून टाकले. पवारांच्या या सभेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने या सभेच्या वर्षपूर्तीसाठी एका छोटेखानी सभेचे आयोजन केले आहे.