'... त्यानंतर नाना पटोले अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 08:10 PM2021-06-15T20:10:21+5:302021-06-15T20:11:52+5:30

नाना पटोले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं आहे. अनेक वेळा त्यांनी हे माझ्याकडे बोलून दाखवलं आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, त्यांच्याकडे फक्त तीन वर्षाचा काळ आहे.

'... then Nana Patole and Ajit Pawar have no chance to become Chief Minister', raosaheb danave says | '... त्यानंतर नाना पटोले अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही'

'... त्यानंतर नाना पटोले अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही'

Next
ठळक मुद्देया तीन वर्षात त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं. त्यानंतर त्यांना संधी मिळणार नाही. कारण 2024 नंतर भाजपची स्वबळावर सत्ता येईल, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.

मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखविल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी अन् शिवसेना नेत्यांनीही या विधानावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता, भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाना पटोलेंना मुख्यमंत्री होण्यासाठी केवळ 3 वर्षांतच संधी आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही तीच संधी असल्याचं दानवेंनी म्हटलं. 

नाना पटोले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं आहे. अनेक वेळा त्यांनी हे माझ्याकडे बोलून दाखवलं आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, त्यांच्याकडे फक्त तीन वर्षाचा काळ आहे. या तीन वर्षात त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं. त्यानंतर त्यांना संधी मिळणार नाही. कारण 2024 नंतर भाजपची स्वबळावर सत्ता येईल, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. तसेच, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही राजकीय कारकीर्द मोठी आहे, ते राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यांनीही मुख्यमंत्री झालं पाहिजे. गावात ग्रामपंचायतीमध्ये लोक एक एक वर्ष किंवा दोन दोन वर्ष सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणे महाविकास आघाडीतील पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं, असा सल्ला दानवे यांनी दिला. दानवेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना असा सल्ला दिलाय. 

तेव्हा मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली

नाना पटोले सध्या विदर्भात विविध ठिकाणी भेटी देत आहेत. गुरुवारी रात्री बुलडाणा येथून अकोल्याला येत असताना त्यांनी महामार्गावरील पारस फाटा येथील एका हॅाटेलला भेट दिली. या हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांनी लॉकडाऊन काळात स्थलांतर करणाऱ्या मजुरांना विनामूल्य जेवण दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून त्यांचा गौरव केला होता. याच मुरलीधर राऊत यांनी पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी भाषण करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली.

प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते - पवार

"नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली असेल तर स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. उद्या तुम्हालाही रिपोर्टरपदावरुन चिफ एडिटर केलं तर आवडणार नाही का? प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. पण शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून जे व्यक्ती आहेत. ते निर्णय घेत असतात. आता कोणत्या पक्षाशी आघाडी करायची की स्वबळावर लढायचं हा अधिकारा काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना आहे. राष्ट्रवादीत शरद पवार आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे आम्ही यावर मत व्यक्त करणं योग्य नाही", असं अजित पवार म्हणाले. 

काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे

नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर  लढेल तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यास नाना पटोले यांची तयारी असल्याची इच्छा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्री पद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्री पद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल, तर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काँग्रेस काढला पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: '... then Nana Patole and Ajit Pawar have no chance to become Chief Minister', raosaheb danave says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.