"सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही"; शिंदे-पवारांचं नाव घेत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 03:50 PM2023-10-23T15:50:23+5:302023-10-23T16:07:19+5:30

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सांगत आहेत

There is no unanimity on the reservation issue within the government itself; Criticism by naming Shinde-Pawar by nana patole | "सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही"; शिंदे-पवारांचं नाव घेत टीका

"सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही"; शिंदे-पवारांचं नाव घेत टीका

मुंबई - राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ट्रिपल इंजिन सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढत चालला आहे. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. सरकारमधील मंत्री बोलतात एक व तर दुसरीकडे जाहिरात देऊन वेगळाच संदेश देत आहेत, ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यास ट्रिपल इंजिन सरकारच जबाबदार असून राज्य सरकारने याप्रश्नी ठोस भुमिका मांडून मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवावी, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सांगत आहेत, मग मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून त्यांना कोणी रोखले आहे का ? १० वर्ष होत आली केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, आजपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही? मागच्याच महिन्यात संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते, या विशेष अधिवेशनात ५० टक्के मर्यादा काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असता तर हा प्रश्न निकाली निघाला असता. आता मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे, डिसेंबर महिन्यात संसदेचे शेवटचे अधिवेशन होईल, त्यानंतर फेब्रवारी महिन्यात आचारसंहिता लागू शकते, अशी माहितीही नाना पटोलेंनी दिली.  

जातनिहाय जनगणना करा

एकाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देणे हे चुकीचे आहे अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेली आहे, ती योग्यच आहे, पण राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करतात ते कळतच नाही आणि दुसरे उपमुख्यमंत्री वेगळेच बोलतात. हे सर्व थांबवून ठोस भूमिका मांडली पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर ‘जातनिहाय जनगणना करावी तसेच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवा’ या राहुल गांधी यांच्या मागणीला सर्वांनी पाठिंबा द्यावा, हे सर्व प्रश्न मार्गी लागू शकतात. 

तेव्हापासून देशात ड्रग्जचे प्रमाण वाढले 

छत्रपती संभाजीनगरमध्ये २५० कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, गुजरातच्या मुंद्रा बंदरात तीन-चार वेळा कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज पडकले गेले आहे. जेव्हापासून देशातील बंदरे मित्रोंना दिली गेली तेंव्हापासून देशभरात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात येत आहेत. या सर्वांचे मुळ या खाजगी बंदरांमध्ये आहे. भाजपा सरकार तरुणांना ड्रग्ज व बिअर उपलब्ध करुन देऊन नशेत डुबवण्याचे पाप करत आहे. शिंदे सरकारने तर आता बियरच्या किमती कमी करण्यासाठी समिती नेमली आहे. उद्या हे सरकार रेशनवरही बिअर देईल, पाण्याच्या जागी बिअरच प्या, असेही धोरण आणतात की काय? असा प्रश्न आहे. भाजपाचे सरकार तरुण पिढीला बरबाद करण्याचे काम करत आहे हा आरोप नसून वस्तुस्थिती आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
 

Web Title: There is no unanimity on the reservation issue within the government itself; Criticism by naming Shinde-Pawar by nana patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.