शिवसेनेच्या 'त्या' प्रस्तावाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा नाही; २०१४ मध्येच होणार होती महाविकास आघाडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 10:33 AM2020-01-20T10:33:29+5:302020-01-20T10:34:00+5:30
पृथ्वीराज चव्हाण मोजूनमापून बोलणारे नेते आहेत, त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते गंभीरपणे घेतलं पाहिजे.
मुंबई - राज्यातील सत्तानाट्यानंतर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला सत्तेच्या बाहेर राहावं लागलं. २०१९ मध्ये राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अनेकांना धक्का बसला होता. युतीत निवडणूक लढवून मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना वेगळे झाले. मात्र २०१४ मध्येच शिवसेनेने काँग्रेससोबत सरकार बनवण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेने २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्ताव दिला नव्हता. काँग्रेसबाबत चर्चा झाली असावी. पण आमच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती हे सत्य आहे असा दावा त्यांनी केला आहे. तर पृथ्वीराज चव्हाण मोजूनमापून बोलणारे नेते आहेत, त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते गंभीरपणे घेतलं पाहिजे. त्यांच्या विधानामध्ये तथ्य होतं असं वाटतं. २०१४ ला डाळ शिजली नाही पण २०१९ मध्ये ते घडलं. आम्ही मैत्रीवर विश्वास ठेवणारे होतो. पाठिंत खंजीर खुपसण्याचं काम केलं गेलं असं सांगत भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानात तथ्य असू शकतं; भाजपाचा दावा
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. यावेळी शिवसेनेला ६३ तर भाजपाला १२२ जागा जिंकता आल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस ४१ तर राष्ट्रवादी ४२ जागांवर विजयी झाली होती. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने तेव्हाही पाऊल उचललं होतं. मात्र त्यावेळी शिवसेनेला यश आलं नाही हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरुन दिसून येतं. अद्याप या प्रकरणावर शिवसेनेने कोणतंही भाष्य केलं नसून नेमकं शिवसेना या वादावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे गरजेचे आहे.
भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेने तेव्हाही आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता - पृथ्वीराज चव्हाण
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले होते की, 2014 नंतर परिस्थिती खूप बदलली आहे. भाजपाने मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी केली. एकहाती सत्ता मिळावी व विरोधी पक्ष संपावेत यासाठी भाजपाने प्रयत्न केले. अशा परिस्थिती भाजपाकडे पुन्हा सत्ता गेली असती तर राज्यातील लोकशाही संपुष्टात आली असती. म्हणूनच मी पर्याची सरकारची कल्पना मांडली. तसेच भाजपा आणि शिवसेनेत तीव्र मतभेद झाल्यावर ते प्रत्यक्षात यावे यासाठी पुढाकार घेतला. माझ्या या कल्पनेला सुरुवातीला विरोध झाला. मात्र मी आग्रह कायम ठेवला. सर्व आमदारांशी बोललो. अल्पसंख्याक नेत्यांशी चर्चा केली. भाजपा आपला नंबर एकचा शत्रू आहे आणि त्याला रोखणे गरजेचे आहे हे सर्वांना पटवून दिले, असेही चव्हाण म्हणाले.