'आघाडीसोबत येण्याची ‘वंचित’ची मानसिकता नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 07:59 AM2019-06-12T07:59:29+5:302019-06-12T08:00:08+5:30

अजित पवार : ३० जूनपर्यंत उमेदवार निश्चित करणार

There is no mentality of 'deprived' to come with the alliance | 'आघाडीसोबत येण्याची ‘वंचित’ची मानसिकता नाही'

'आघाडीसोबत येण्याची ‘वंचित’ची मानसिकता नाही'

Next

अतुल कुलकर्णी 

मुंबई : विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र आघाडीसोबत येण्याची अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीची मानसिकता दिसत नाही, असे राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राष्टÑवादीच्या उमेदवाराची नावे ३० जूनपर्यंत निश्चित केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्टÑवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी येत्या निवडणुकीत तरुणांना संधी द्यावी, शहरांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या. यावर अजित पवार म्हणाले, पराभव कशामुळे झाला याची चर्चा करण्यात आता अर्थ नाही. आमचे लक्ष विधानसभेकडे आहे. शहरी भागात पक्ष वाढविणे प्रयत्न सुरु केले आहेत, नव्या चेहऱ्यांना या वेळी मोठ्या प्रमाणावर संधी देणार आहोत.

‘शहराकडे चला’ असा नारा देण्याची गरज का पडली?
१९९९ साली आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा; मी, आर.आर. पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे हे पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झालो. आम्ही सगळे ग्रामीण भागाशी संबंधित होतो. छगन भुजबळ मुंबईशी संबंधित होते. शहरी विभाग आमच्याकडे आले नाहीत. ही चूक सुधारण्यासाठी आम्ही शहरी भागातील लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.
नव्यांना संधी देताना इच्छुक नाराज होतील, त्यांचे काय?
कोणत्याही पक्षातर्फे १०० टक्के विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळत नाही. आमच्याही काही आमदारांना तिकीटे नाकारावी लागतील.
दोन्ही काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते निवडणुकीत एकमेकांविरोधात काम करतात, अशा तक्रारी आहेत. विधानसभेतही तसेच झाले तर?
तसे होणार नाही, कारण आम्ही यावेळी सर्व सहयोगी पक्षांमधील ऐकेक नेत्यांना घेऊन एक समिती स्थापन करत आहोत. ज्या मतदारसंघात तक्रारी येतील, त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. ही समिती राज्यभर लक्ष ठेवेल. कोणाचे काही प्रश्न असतील, तर तेही लगेच सोडवले जातील.
बहुजन वंचित आघाडीसोबत घेणार का?
लोकसभेचे निकाल लागल्यापासून वंचित आघाडीचे नेते जी विधाने करत आहेत ते पहाता आमच्यासोबत येण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. त्यांच्यामुळे आमच्या ८ ते १० जागा पडल्या. वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम म्हणून काम करत होती हे आम्ही सतत सांगत होतो. जनतेला कळून चुकले आहे.
मनसेला सोबत घेणार का?
आम्ही अजून राज ठाकरे यांच्याशी चर्चा केलेली नाही. विधानसभेबद्दल नंतर बोलेन असेही ते म्हणाले होते. त्यामुळे ते काय विचार करतात, सहयोगी काँग्रेस पक्षाची लोकसभेच्या वेळी वेगळी भूमिका होती, नंतर त्यांच्याच काही नेत्यांना राज ठाकरेंची सभा झाली पाहिजे असे वाटू लागले. त्यामुळे आता काँग्रेसला भूमिका स्पष्ट करावी लागेल.

१३ जूनपासून जिल्हानिहाय बैठका
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात १३ ते १५ व २१ आणि २३ जून असे पाच दिवस सर्व जिल्ह्यांतील नेते, इच्छुक उमेदवारांच्या बैठका होतील. ३० जूनपर्यंत आम्ही आमचे काम पूर्ण करू. काँग्रेसही या कामात गती घेईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
 

Web Title: There is no mentality of 'deprived' to come with the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.