"अरुणाचल प्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी नव्हतीच, मग आमदार भेटलेच कसे?"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 09:49 AM2024-03-07T09:49:39+5:302024-03-07T10:03:09+5:30
लोकसभा निवडणुकांच्या घोषणेला अवघे काही दिवस उरले आहेत
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांद मोठ्या निवडणुकीला दोन्ही गट आमने-सामने येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महायुती व महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले आहे. त्याच, अनुषंगाने दोन्ही पक्षातील नेतेमंडळी कामाला लागली आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखविण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही जवळ केले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादीच्या आमदाराने भेट घेतल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. त्यावर, शरद पवारांच्या पक्षाने जोरदार पलटवार केला, तसेच, प्रश्नही उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या घोषणेला अवघे काही दिवस उरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बारामती मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पहिल्यांदाच स्वत:ची ताकद निवडणुकीतून आजमावत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागालँडमधील आमदार आपल्यासोबत असल्याचं यापूर्वीच अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. आता, अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादीच्या आमदार व कार्यकर्त्यांनी भेट घेतल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. त्यावर, अरुणाचल प्रदेशमध्ये गत निवडणुकीत राष्ट्रवादी सहभागीच नव्हती, असे शरद पवार गटाने म्हटले आहे.
अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि पदाधिकारी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचं मनापासून स्वागत केलं. या भेटीदरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा पार पडली, असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे. अजित पवारांच्या या ट्विटला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रत्युत्तर देत प्रश्न उपस्थित केला आहे.
''काय....? अरुणाचलप्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे आमदार...? अहो, अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहभागच घेण्यात आला नव्हता... मग आमदार झाले तरी कधी ? हा आता... अदृश्य शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार अरुणाचल प्रदेशच्या यादीत दाखवले असतील, तर ती वेगळी गोष्ट...अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये तितकाच फरक आहे जितका महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे, हे समजणं अत्यावश्यक आहे, असे म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांना टोला लगावला.
काय....? अरुणाचलप्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे आमदार...? अहो, अरुणाचलप्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहभागच घेण्यात आला नव्हता... मग आमदार झाले तरी कधी ? हा आता... अदृश्य शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार अरुणाचलप्रदेशच्या यादीत दाखवले… https://t.co/NAjfPq6Tew
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 7, 2024
आता घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आल्यानंतर हा राज्या राज्यातील फरकांचा गोंधळ उडणारच म्हणा...! त्यामुळे ज्या भाजपसोबत आपण गेलात त्यांच्या, खोटं बोल पण रेटून बोल या परंपरेचा वाण नाही पण गुण लागला हे दुर्दैव. आपला रोखठोक बाणा अजूनही शाबूत असेल तर, चूक स्वीकारा पण भाजपप्रमाणे ट्विट डिलीट करू नका, ही नम्र विनंती! असे आव्हानही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवारांना दिलं आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आपल्यासोबत असल्याचे दाखवण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. मात्र, शरद पवार गटाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर आता अजित पवार उत्तर देतील, हे पाहावे लागेल.