"हातात घड्याळही राहणार नाही"; कोर्टाच्या निर्णयानंतर रोहित पवारांचा 'दादां'वर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 07:22 PM2024-03-19T19:22:47+5:302024-03-19T19:31:40+5:30

राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुप्रीम कोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली होती

"There will be no watch in the hand"; Rohit Pawar targets 'Ajit Pawar' after the Supreme Court decision on ncp symbol | "हातात घड्याळही राहणार नाही"; कोर्टाच्या निर्णयानंतर रोहित पवारांचा 'दादां'वर निशाणा

"हातात घड्याळही राहणार नाही"; कोर्टाच्या निर्णयानंतर रोहित पवारांचा 'दादां'वर निशाणा

मुंबई - शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद अद्यापही संपुष्टात आला नाही. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाबाबत निर्णय दिला आहे. त्यानुसार, शिवसेना पक्ष आणि चिन्हा एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना मिळालं आहे. मात्र, याबाबत अद्यापही सर्वोच्च न्यायालयातील लढाई सुरू आहे. त्याच, अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यावरुन आता आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच, अजित पवार बाल मित्र मंडळ म्हणत अजित पवारांच्या समर्थकांना टोलाही लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुप्रीम कोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. "अजित पवार गटाने इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांमध्ये नोटीस जारी करावी आणि प्रचाराच्या सर्व जाहिरातींमध्ये असे नमूद करावं की, त्यांना निवडणूक आयोगाने दिलेलं 'घड्याळ' हे चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष या नावाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे," असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यावरुन, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. 

आदरणीय पवार साहेबांचं नाव न वापरण्याचं हमीपत्र देण्याचे आणि पक्ष व घड्याळ चिन्हाचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने ते तात्पुरतं असल्याची जाहीरात देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने फुटीर ‘अजितदादा मित्र मंडळा’ला दिल्याने या मंडळाची अवस्था आगीतून उठून फुपाट्यात पडल्यासारखी झालीय. एकतर भाजप वापरुन घेतंय आणि आता न्यायालयीन निकालाच्या अधिन राहून (अटी लागू) अशी अट खुद्द न्यायालयानेच घातल्याने या मंडळाच्या विश्वासार्हतेचा जाहीर पंचनामाच झालाय, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  

आता या मंडळाला लोकसभेसाठी चार जागा तरी मिळतील की नाही, याची शंका आहेच. पण, विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत यांच्या हातात घड्याळही राहणार नाही आणि त्यातली वेळही बदलून बारा वाजलेले असतील, यात शंका नाही, असा टोलाही रोहित यांनी लगावला. दुसरीकडे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाला तुतारी चिन्हावरच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढण्यास मान्यता देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे रोहित यांनी म्हटले. तसेच, याबाबत न्यायालयाचे आभारही मानले आहेत. 

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत अजित पवार आणि त्यांच्या समर्थनातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 
 

Web Title: "There will be no watch in the hand"; Rohit Pawar targets 'Ajit Pawar' after the Supreme Court decision on ncp symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.