इंडिया आघाडीच्या बैठकीत 'हे' ३ ठराव मंजूर, आदित्य ठाकरेंनी दाखवले वाचून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 08:10 PM2023-09-01T20:10:24+5:302023-09-01T20:25:32+5:30
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी या बैठकीत घेण्यात आलेले ३ ठराव वाचून दाखवले
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक संपन्न झाली. येथील हॉटेल ग्रँड हयात येथे होत असलेल्या या बैठकीची सांगता आज सायंकाळी झाली. बैठकीदरम्यान, विरोधी पक्षाच्या २८ पक्षातील नेत्यांनी उत्स्फुर्त सहभाग दर्शवत मोदी सरकारवर आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतरही नेत्यांनी सहभागी होत पत्रकार परिषदेत बैठकीचा वृत्तांत दिला. या बैठकीत ३ ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी या बैठकीत घेण्यात आलेले ३ ठराव वाचून दाखवले. या ठरावाला अनुसरून इंडिया आघाडीतील सर्वच राजकीय पक्ष काम करणार आहेत. त्यानुसार, देशात मोदी सरकारविरुद्ध आवाज उठवत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रणनिती आणि तयारी आखली जणार आहे.
आज मुझे INDIA पार्टीज के रिजोल्युशन को देशवासियों के सामने लाने का भाग्य प्राप्त हुआ। pic.twitter.com/bZLvuAz8lS
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 1, 2023
आदित्य ठाकरेंनी वाचून दाखवलेले ३ ठराव
१. इंडिया आघाडीतील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभेच्या निवडणुका शक्य तितक्या एकत्रितपणे लढणार आहेत.
२. लवकरच देशाच्या विविध राज्यांमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. ही प्रक्रिया गिव्ह अँड टेक भावनेने पूर्ण केली जाईल. तसेच, देशातील विविध भागांत संयुक्त रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. सार्वजनिक प्रश्नांवर या रॅली होतील.
३. I.N.D.I.A. आघाडीकडून सर्व प्रकारचा संवाद आणि माध्यमांसंदर्भातील रणनीती, तसेच कॅम्पेनची थीम वेगवेगळ्या (प्रादेशिक) भाषांमध्ये असेल. ही थीम "जुडेगा भारत, जीतेगा इंडिया", अशी असेल.
दरम्यान, I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत १३ सदस्यीय समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या पॅनेलमध्ये केसी वेणुगोपाल, शरद पवार, एमके स्टॅलिन, संजय राऊत, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, राघव चढ्ढा, जावेद खान, लल्लन सिंग, हेमंत सोरेन, डी राजा, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांचा समावेश आहे. ही समिती येत्या ३० सप्टेंबरपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणार आहे.
खर्गेंचा मोदींवर निशाणा
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यावेळी म्हणाले की, आमच्या दोन्ही बैठका यशस्वी ठरल्या. कारण, आमच्या बैठकांनंतर पंतप्रधानांनी त्यांच्या त्यानंतरच्या भाषणात केवळ भारतावर टीका केली नाही, तर आपल्या प्रिय देशाचाही अपमान केला आहे. त्यांनी चक्क दहशतवादी संघटनेशी तुलना केली. या सरकारच्या सूडाच्या राजकारणामुळे येत्या काही महिन्यांत आणखी हल्ले, आणखी छापे आणि अटकेसाठी आपण तयार असले पाहिजे.