'हे खरे लोकशाहीला शोभणारे नेते आहेत'; अमोल कोल्हेंनी सुप्रिया सुळेंचं केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 10:44 AM2022-04-09T10:44:00+5:302022-04-09T10:44:42+5:30
आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या.
मुंबई- उच्च न्यायालयाने गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका जत्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला.
आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदाेलकांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली हाेती. या हल्ल्यामागे सूत्रधार कोण, याचा शोध सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा सदावर्ते यांना अटक करण्यात आली.
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी घराबाहेर येत आंदोलकांना शांत होण्याचे आवाहन केले; मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत, तुम्ही आधी शांत व्हा. त्याशिवाय बोलता येणार नाही, असे त्या सांगत असतानाही कामगारांची घोषणाबाजी सुरूच होती. त्यानंतर मात्र घरात माझे आई, बाबा आणि मुलगी आहे. त्यांची सुरक्षा मला पाहू दे, असे म्हणत सुप्रिया सुळे घरात गेल्या.
सुप्रिया सुळेंच्या या कृतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी कौतुक केलं आहे. आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुंबई येथील निवासस्थानी घडलेला प्रकार धक्कादायक होता. परंतु दडपशाही वा दबावतंत्र वापरणे असे काहीही न करता सुप्रिया सुळे स्वतः आंदोलकांसमोर गेल्या व त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. हे खरे लोकशाहीला शोभणारे नेते आहेत, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांची पवारांशी फोनवरून चर्चा
हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नेमकी घटना कशी घडली याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडून घेतली. या कृत्यामागे कोण आहेत ते शोधून कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
अस्वस्थता पसरविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न
आमचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यामागे राजकीय पक्ष, अज्ञात शक्तींचा हात असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने चौकशी केली जाईल. - दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री