शिवसेना सोडल्यानंतरही विजयी झाले 'हे' नेते; राणेंनी सभागृहातच वाचून दाखवली यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 07:57 AM2023-03-01T07:57:13+5:302023-03-01T08:00:37+5:30
अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन आमदार नितेश राणेंनी राष्ट्रवादीला फटकारले.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'पुण्यात एका सभेत बोलताना अजित पवारांनी नारायण राणेंवर जोरदार टीका करत राणेंना पराभवाची आठवण करुन दिली होती, नारायण राणेंना तर बाईनं पाडलं, असे म्हणत अजित पवारांनी त्यांना हिणवलं होतं. त्यावरुन, आता राणेपुत्र आमदार नितेश राणेंनी थेट सभागृहातूनच चॅलेंज दिलं आहे. तसेच, शिवसेना सोडल्यानंतर नेत्यांचा पराभव होतो, असा खोटा प्रचार केला जातोय, असेही राणेंनी उदाहरणासह स्पष्टीकरण दिलं.
अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन आमदार नितेश राणेंनी राष्ट्रवादीला फटकारले. तसेच, शिवसेना सोडून गेल्यानंतर सर्वांच नेत्यांची अवस्था वाईट झाली हे खोटं आहे, खोटी माहिती सर्वत्र पसरवली जाते, असे म्हणत नितेश राणेंनी शिवसेना सोडल्यानंतरच्या नेत्यांचा इतिहासच समाजावून सांगितला.
नारायण राणेंनी २००५ साली जेव्हा शिवसेना सोडून निवडणूक झाली, तेव्हा त्यांच्या विरोधी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं. कालिदास कोळंबरक, शंकर कांबळी, गणपत कदम, सुभाष बणे, विजय वडेट्टीवार हे आज सभागृहात आहेत. विनायक निम्हण, माणिकराव कोकोटे, प्रा. नवले, शाम सावंत यांपैकी एकमेव शाम सावंत पराभूत झाले होते, बाकी सर्वच नेते मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत, असा इतिहासच आमदार नितेश राणेंनी सभागृहात सांगितला.
कोळंबकर हे मुंबईत शिवसेनेविरुद्धा २० हजार मतांनी निवडून आले, शिवसेना सोडून हे काँग्रेसमध्ये गेलेले नेते मोठ्या फरकाने निवडून आले आहेत, मग कशाला चुकीची माहिती महाराष्ट्राला द्यायची, असे म्हणत राणेंनी अजित पवारांवर पलटवार केला. तसेच, राणेंना बाईंनी पाडलं, बाईंनी पाडलं म्हणत महिलांचा जो अपमान केला जातो, त्याचा खरा इतिहास महाराष्ट्राला माहिती पाहिजे. आता, २ मार्च रोजी पिंपरी चिंचवडचा निकाल येईल, तेव्हा पाहुयात बाई कोणाला पाडतेय ते, असे म्हणत आमदार नितेश राणेंनी अजित पवारांना सभागृहातच लक्ष्य केलं.
अजित पवारांना नारायण राणेंचं प्रत्युत्तर
'माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन बारा वाजवीन' असा इशारा राणे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिला होता. यावर आता अजित पवार यांनी एका शब्दात उत्तर दिले आहे. स्वागत आहे, असे म्हणत अजित पवार यांनी नारायण राणेंवर पलटवार केला.