‘त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे’, क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या अवमानावरून खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 06:00 AM2023-07-28T06:00:19+5:302023-07-28T06:00:34+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाणावरून विधानसभेत गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले.
मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाणावरून विधानसभेत गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. सावित्रीबाई फुले यांच्याबाबत विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या बांधून रस्त्यावरून फिरवले पाहिजे. परंतु, सरकारकडून त्यावर कारवाई करण्याऐवजी दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला. मुसक्याच बांधायच्या नाही, तर सावित्रीबाईंची बदनामी करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे, ही सरकारची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकीकडे सत्य बोलणाऱ्या राहुल गांधींवर दोन वर्षांची बंदी घातली जाते, तर दुसरीकडे महापुरुषांबाबत लिखाण करणारे मोकाट फिरतात हा कसला न्याय, असा जाब विरोधकांनी विचारताच सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होऊन गदारोळ झाला. कोणत्याही महापुरुषांबद्दल चुकीचे लिखाण करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, असे आश्वासन फडणवीस यांनी सभागृहाला दिले. परंतु, संतप्त विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करत सभात्याग केला.
‘आमच्याही भावना तुमच्यासारख्याच...’
फडणवीस म्हणाले की, आमच्याही भावना तुमच्यासारख्याच आहेत. गुन्हेगाराला चौकात फाशी दिली पाहिजे, अशा मताचे आम्ही आहोत. मात्र, कायद्याने कारवाई करावी लागेल. ज्या वेबसाइटने वृत्त शेअर केले, त्याच्यावरही कारवाई केली आहे. सावित्रीबाईंबद्दल भारद्वाजस्पीक नावाच्या हॅण्डलने अवमानकारक लिखाण केले आहे. त्यासंदर्भात आपण ट्विटरला तीन पत्रे लिहिली असून, त्याची माहिती मागितली आहे.
‘त्यांच्या मुसक्या बांधून धिंड काढा’
सावित्रीबाईंबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या वेबसाइटवर बंदी घालावी, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी तारांकित प्रश्न मांडला होता.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरले. वेळीच कडक कारवाई केली नाही, तर महापुरुषांच्या बदनामीचे लोण पसरू शकते. त्यामुळे अशा गुन्हेगाराला सरकारने शोधून त्याच्या मुसक्या बांधून, भर रस्त्यात त्याची धिंड काढली पाहिजे, असा संताप थोरात यांनी व्यक्त केला.