"या शंकेला बळ मिळतंय"; काका-पुतण्याच्या भेटीवर शिवसेनेकडून स्पष्ट नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 08:19 AM2023-08-14T08:19:25+5:302023-08-14T08:50:51+5:30
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली. या ...
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनीही खुलासा करत ही काका-पुतण्याची भेट होती, असे म्हटले. विशेष म्हणजे गेल्या ४३ दिवसांत अजित पवारांनी ४ वेळा शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकीय वर्तुळाच चर्चा आणि महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होत आहे. शिवसेनेनंही या भेटीवर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत या भेटीगाठी म्हणजे गंमत-जंमत असल्याचं म्हटलंय. मात्र, अशा भेटींमुळे संभ्रम वाढून शंकेला बळ मिळत असल्याचंही शिवसेनेनं मुखपत्रातून म्हटलं आहे.
गंमत-जंमत म्हणत शिवसेनेकडून काका-पुतण्यांच्या भेटीवर भाष्य करण्यात आलंय. त्यामध्ये, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजारपणावरही टोलेबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपद जाणार म्हणून शिंदेंची झोप उडाली असून आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीचे बुलेटीन जारी करावे, असेही शिवसेनेनं अग्रलेखातून म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गमतीचे आहे. काही भेटी उघडपणे झाल्या, तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भारतीय जनता पक्षाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे. अर्थात अजित पवारांच्या अशा भेटीने संभ्रम होईल, वाढेल यापलीकडे जनतेची मने पोहोचली आहेत. या रोजच्या खेळाने मनास एक प्रकारची बधिरता आली आहे व त्यास सध्याचे राजकारण जबाबदार आहे.
काका-पुतण्यांच्या भेटी गंमत-जंमत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अनेकदा परखड विधाने करतात. त्यातही बऱयाचदा गंमत असते. ''अजित पवार हे 'मविआ'त परत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. अजितदादांना उपरती झाली असेल म्हणून ते शरद पवारांना भेटले असतील'', असे नाना म्हणाले. त्याआधी नाना यांनी सांगितले की, ''महाराष्ट्रातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राज्यातील सरकार हे 'गंमत जंमत' सरकार आहे.'' नानांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत, पण त्यात थोडी भर टाकून सांगतो, पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे. नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झालेय. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही.
आरोग्यमंत्र्यांनी बुलेटीन जारी करावे
अजित पवार सरकारात घुसल्यावर शिंदे व त्यांच्या गटाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि मन अस्थिर झाले. त्यात अजित पवार हे अधूनमधून शरद पवारांना भेटू लागल्याने या सगळय़ांच्याच लहान मेंदूस त्रास सुरू झाला, पण त्यासाठी दूर साताऱयात जाऊन सततच आराम करणे हा उपाय नाही. शिंदे गटाने त्यांच्या नेत्यास तत्काळ मुंबई-ठाण्यातील इस्पितळात दाखल करून उपचार सुरू केले पाहिजेत. शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे साताऱयात जाऊन गावठी उपचार, जडीबुटी, जादूटोणा, बुवाबाजीच्या माध्यमातून उपचार करून घेणे योग्य नाही. आरोग्य हीच संपत्ती आहे व त्या संपत्तीचे रक्षण खोक्यांनी होत नाही. दुसरे असे की, मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्मास आलेले नाही. 'मी पुन्हा येणार'वाल्यांनाही 'उप' वगैरे होऊन उपऱयांच्या पखाली वाहाव्या लागत आहेत, पण शिंदे यांना वाटते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपणच, पण अजित पवारांमुळे त्यांच्या श्वासनलिकेत अडथळे निर्माण झाले व त्यांना अलीकडे गुदमरल्यासारखे होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नक्की काय त्रास होतोय? त्यांचा आजार पसरलाय? आजाराचे मूळ काय? याबाबत आरोग्य मंत्र्यांनी विशेष बुलेटिन जारी केले तर बरे होईल.
भेटीवर काय म्हणाले शरद पवार
भाजपची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणात बसत नाही. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम असून भाजपबरोबर जाणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोला येथे पत्रकार परिषदेत मांडले. अजित माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितले तर मी आता कुटुंबात वडीलधारी आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी त्यांना भेटलो. या भेटीने माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, अशी भूमिका मांडून अजित पवारांसोबत झालेल्या गुप्त बैठकीच्या चर्चेवर त्यांनी पडदा टाकला.