ही हुकुमशाही नाही, अल्टीमेटम तर अजिबात देऊ नये; अजित पवारांचा राज ठाकरेंना सज्जड दम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 10:56 AM2022-05-05T10:56:15+5:302022-05-05T10:56:33+5:30
कायदा हातात घेण्याचं धाडस कुणी दाखवू नये. वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातील सर्व सरकारला करावी लागेल असं त्यांनी सांगितले.
मुंबई – जे कुणी कायदा सुव्यवस्था अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील त्यांनाही नोटीस पाठवून खबरदारी घेतली. कुणीही अल्टीमेटमची भाषा वापरू नये. कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. सरकार कायदा व नियमांवर चालत असतं. सर्व धार्मिक स्थळांना समान नियम लागू होईल. यूपीत अनेक साधू संतांनी, मौलवींनी स्वत:हून आवाहन करत भोंगे उतरवले. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंगे योगी सरकारनं उतरवले नाहीत. महाराष्ट्र छत्रपतींच्या विचाराने पुढे चालला आहे. कुठेही कायदा अडचणीत येणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे. राज्यात जितकी धार्मिक स्थळ आहेत त्यांनी रितसर परवानगी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार(Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, धार्मिक स्थळांनी रितसर परवानगी घ्यावी. कुठल्याही धार्मिक आव्हानाला बळी पडू नये. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. गृहमंत्र्यांनी पोलिसांना योग्य ती सूचना दिली आहे. सर्व धार्मिक स्थळांना राज्य सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. परवानगी न घेतलेल्यांवर राज्य सरकार कारवाई करेल. प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे गोष्टी होतील. कायदा हातात घेण्याचं धाडस कुणी दाखवू नये. वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातील सर्व सरकारला करावी लागेल असं त्यांनी सांगितले.
तसेच रात्री उशीरा १० च्या पुढे हरिनाम सप्ताह, जागरण गोंधळ सुरू असतो. ग्रामीण भागात कार्यक्रम होत असतात. न्यायव्यवस्थेच्या निर्णयाचं तंतोतंत पालन करण्याचं ठरवलं तर सगळ्याच धार्मिक कार्यक्रमांबाबतीत तो निर्णय घ्यावा लागेल. कायद्याप्रमाणे आवाजाची मर्यादा ठेवूनच सहकार्य केले पाहिजे. मागील २-३ दिवसांत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं सर्व पालन करत आहेत. सर्व धार्मिक स्थळांना त्याचे पालन करावे लागत आहे. कायद्याची अंमलबजावणी सगळ्यांसाठी एकसारखीच आहे. कुणालाही दुजाभाव करता येत नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
दरम्यान, लोकांच्या भावना भडकावणे, वेगळी भूमिका मांडून ते लोकांना सांगणं सोप्पं जातं. परंतु नियमाची अंमलबजावणी करताना सगळ्यांनाच करावी लागणार आहे. कायदा, नियम मोडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अल्टीमेटम देण्याचा तर अजिबात प्रयत्न करू नये. ही हुकुमशाही नाही. जाहीरपणे अशी वक्तव्य करायला लागली तर ते चालत नाही. कायद्याने राज्य चालत असते. नियम सर्वांना सारखेच असतात असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना(Raj Thackeray) दिला आहे.