"पुण्यातील ते दोन अधिकारी चांगले होते, पण राजकीय दबावामुळे मी बदल्या केल्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 09:38 AM2023-10-18T09:38:52+5:302023-10-18T10:53:56+5:30

आपल्या आयुक्तपदाच्या कार्यकाळाबाबत मोठा गौप्यस्फोट करताना मीरा बोरवणकरांनी सांगितले की, माझ्या आयुक्तपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता.

"Those two officials in Pune were good, but due to political pressure I transferred them.", Prithviraj chavan in pune about mira borvankar | "पुण्यातील ते दोन अधिकारी चांगले होते, पण राजकीय दबावामुळे मी बदल्या केल्या"

"पुण्यातील ते दोन अधिकारी चांगले होते, पण राजकीय दबावामुळे मी बदल्या केल्या"

माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिश्नर या पुस्तकामधील काही धक्कादायक गौप्यस्फोटांमुळे राज्यातील वातावरण सध्या तापलेलं आहे.  मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेल्या दाव्यांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अडचणीत आले आहेत. दरम्यान, या दाव्यांमुळे अजित पवार यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असतानाच आता मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर, आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही केलेल्या विधानाचा या प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे. मुख्यमंत्री असताना आपल्यावर २ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रचंड दबाव होता, असे चव्हाण यांनी म्हटले.  

आपल्या आयुक्तपदाच्या कार्यकाळाबाबत मोठा गौप्यस्फोट करताना मीरा बोरवणकरांनी सांगितले की, माझ्या आयुक्तपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. मात्र मला आघाडीधर्म पाळावा लागेल, असं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, असे मीरा बोरवणकर म्हणाल्या. दरम्यान, याबाबत स्पष्टीकरण देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जमिनीच्या व्यवहाराप्रकरणात माझा काही संबंध नाही. मी त्यानंतर मुख्यमंत्री बनलो होतो. त्याबरोबरच त्यांनी बदलीच्या संदर्भात माझं नाव घेतलं आहे. मात्र, प्रशासकीय कामानिमित्त त्यांनी मला बदलीची विनंती केली होती. मात्र, मला आता याबाबत फार काही आठवत नाही. काय लिहिलंय ते पाहण्यासाठी मला ते पुस्तक वाचावं लागेल, असे चव्हाण यांनी सांगितले. मात्र, एका चॅनेलच्या मुलाखतीत त्यांनी दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आपल्या प्रचंड दबाव होता, असेही त्यांनी म्हटले आहे.  

सरकार हे रुलबेस्ड असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला जे पाहिले ते करा. पण, सरकारने नियमांना धरुनच काम केलं पाहिजे. कारण, नियम बनवणारे सरकार असते. म्हणून नियमाने वागलं पाहिजे. अनेकदा असं होतं, हा अधिकारी चुकीचं वागतोय, तो नियमावर बोट ठेऊन काम करतोय. पण हे नियम तुम्हीच केलेले आहेत, अधिकाऱ्यांनी केलेले नाहीत. तुम्ही नियम करुन हे नियम तू पाळ, असं अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारमधील मंत्र्यांनी नियमानुसारच काम करायला हवे, असे म्हटले. तसेच, अनेक अधिकारी कडक नियम पाळायला लागले की आपण त्यांच्या बदल्या करतो, असेही ते म्हणाले. 

दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी माझ्यावर खूप राजकीय दबाव होता. मला ते पटत नव्हतं, पण शेवटी खूपच राजकीय दबाव असल्याने ते स्वीकारावं लागलं होतं. मी त्या अधिकाऱ्यांची नावे घेणार नाही. पण, ते अधिकारी चांगलं काम करत होते, पुण्यात काम करत होते. दुर्दैवाने मला त्यांच्यावर अन्याय करावा लागला, अशी प्रांजळ कबुलीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. चव्हाण यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, कदाचित मीरा बोरवणकर यांच्याशी त्यांच्या विधानाचा संबंध जोडला जाऊ शकतो. कारण, पृथ्वीराज चव्हाण हे १० नोव्हेंबर २०१० ते २८ सप्टेंबर २०१४ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

काय म्हणाल्या मीरा बोरवणकर

मीरा बोरवणकर यांनी द मिनिस्टर या प्रकरणामध्ये म्हटले आहे की, पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. तसेच आसपासच्या पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेतला. एक दिवस विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. त्यांना तुम्ही एकदा भेटा. येरवडा पोलिस ठाण्याच्या जमिनीसंबंधित विषय असल्याचे त्यांनी मला सांगितलं. त्यानुसार विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलिस ठाणे परिसराचा नकाशा होता. त्यांनी सांगितले की, या जमिनीला लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल, त्याच्यासोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. पुढे या पुस्तकात, मी (मीरा बोरवणकर) पालकमंत्र्यांना सांगितले की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही, असाही उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोरवणकर यांनी केलेल्या या आरोपांचं खंडन केलं आहे. अशा प्रकारच्या जमिनींचा लिलाव करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना नाहीत. अशी प्रकरणे महसूल विभागाकडे जातात आणि नंतर मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेते. रेडिरेकनरनुसार मंत्रिमंडळ जमिनीची किंमत ठरवते. त्यामुळे या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: "Those two officials in Pune were good, but due to political pressure I transferred them.", Prithviraj chavan in pune about mira borvankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.