TRP Scam : अर्णब यांना अटक करायची असेल तर ३ दिवसाआधी नोटीस द्या; हायकोर्टाचे पोलिसांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:35 PM2021-03-24T17:35:09+5:302021-03-24T17:36:17+5:30
TRP Scam : न्यायालयाने अर्णब गोस्वामी आणि वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आउटलियर मीडिया या कंपनीची याचिका दाखल करुन घेतली.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी १२ आठवड्यांत तपास पूर्ण करु अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात आज दिली आहे. यावेळी उच्च न्यायालयाने रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी महत्वाचे आदेश दिले. त्यांना अटक करण्यापूर्वी ३ दिवस आधी नोटीस देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना उच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने अर्णब गोस्वामी आणि वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आउटलियर मीडिया या कंपनीची याचिका दाखल करुन घेतली. सुनावणीदरम्यान आतापर्यंत कारवाईपासून दिलेला दिलासा न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यासह पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण द्यावे, तसेच प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा या मागणीसाठी गोस्वामी आणि एआरजी आउटलियर मीडिया कंपनीने याचिका केली होती. या याचिकांवर न्या. एस.एस.शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सध्या नियमित सुनावणी सुरू आहे.
TRP Scam: ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट केवळ दाेन मित्रांमधील संभाषण; वकिलांचा दावा
गोस्वामी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर संशयित आरोपीची किती दिवस टांगती तलवार ठेवणार? तपास असाच सुरू ठेवता येऊ शकत नाही अशा मुद्द्यांवर न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली. अर्णब गोस्वामी आणि एआरजी आऊटलीयर कंपनीसंबंधी अटकेची कारवाई करायची असल्यास तीन दिवस आधी नोटीस द्यावी असा आदेश न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिला. या प्रकरणाचा तपास कधीपर्यंत पूर्ण करणार हे बुधवारच्या सुनावणीत स्पष्ट करण्याचं न्यायालयाने पोलिसांना बजावलं होतं. राज्य सरकारकडून १२ आठवड्यात तपास पूर्ण केला जाईल अशी माहिती देण्यात आल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.