'मला राजकीय आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न'; यशोमती ठाकूर यांनी केला दावा
By मुकेश चव्हाण | Published: October 15, 2020 08:56 PM2020-10-15T20:56:03+5:302020-10-15T20:56:46+5:30
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे
मुंबई: काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्या आणि महाविकास आघाडी सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना १५ हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. आठ वर्षांपूर्वीच्या एका खटल्याचा निकाल देताना अमरावती न्यायालयानेयशोमती ठाकूर यांना ही शिक्षा सुनावली आहे. न्यायलयाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आपण माघार घेणार नाही. माझा भाजपाशी लढा सुरुच राहिल, असं विधान यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे. या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मात्र शेवटी सत्याचा विजय होईल, असं योशमती ठाकूर यांनी सांगितले. तसेच बाकी राजीनामा देण्याच्या मागणीबाबत, तर एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजपा लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजपासोबत माझी वैचारिक लढाई आहे, आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान, आठ वर्षांपूर्वी २४ मार्च २०१२ रोजी आमरावतीमधील अंबादेवी मंदिराजवळ यशोमती ठाकूर आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामकाजात अडथळा आणणे, याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अमरावती जिल्हा न्यायालयाने यशोमती ठाकूर यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच या प्रकरणामध्ये यशोमती ठाकूर यांचा कारचालक आमि त्यांच्यासोबत असलेले दोन कार्यकर्तेगी दोषी आढळले आहेत. त्याबरोबरच फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलीसही शिक्षेस पात्र ठरला आहे.