'५० खोके, नागालँड ओक्के'वरुन विधानसभेत तू तू मै मै; CM शिंदेंनी काढला चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 01:52 PM2023-03-09T13:52:35+5:302023-03-09T13:55:49+5:30
राष्ट्रवादीच्या या पाठिंब्यावरुनच शिंदेंच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनीही विधानसभेत डायलॉगबाजी केली.
मुंबई - भाजपला तीन राज्यांच्या निवडणुकीत चागंलं यश मिळालं. त्यापैकी, नागालँडच्या निकालात NDPP आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील २ पक्षांनीही जागा पटकावल्या. त्यात रामदास आठवलेंच्या आरपीआयने २ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवला. नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप सरकारला इतर छोट्या पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. त्यानंतर, आता राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरला. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीच्या या पाठिंब्यावरुनच शिंदेंच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनीही विधानसभेत डायलॉगबाजी केली.
नागालँडमध्ये राष्ट्रवादीने फक्त मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलाय. बदलाचे वारे कसे वाहिला लागलेत पाहा, मला वाटतंय नागालँडमध्येही ५० खोके, बिल्कुल ओके.. असं झालंय का? असा सवाल करत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एकीकडे आम्हाला जातीवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि तिकडे मांडीला मांडी लावून बसायचं, त्यामुळेच आमचा सवाल आहे, ५० खोक्के आणि नागालँड ओक्के, असं झालंय का? असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. त्यावर, अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.
अजित पवारांचं प्रत्युत्तर
राज्य सरकार आणि केंद्र सरकार तुमच्या हातात आहे, मग तुम्ही चौकशी करा. सगळ्या एजन्सीच तुमच्या हाती आहेत, मग चौकशी करायला तुम्हाला कोणी अडवलंय. कारण नसताना असं कोणावरही कशाप्रकारे आरोप करणे योग्य नाही, असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी गुलाबराव पाटील यांना दिले. त्यानंतर, पुन्हा छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीची बाजू मांडली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर देत राष्ट्रवादीसह विरोधकांना टोला लगावला.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
छगन भुजबळ म्हणाले आम्ही केवळ मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला. पण, हा कसला पाठिंबा, हे सगळं सोयीचं झालं. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोपरखळी लगावली. तसेच, २०१४ साली महाराष्ट्रातही तुम्ही न मागता भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे, शिशे के घर मे रहनेवाले, दुसरों के घर पत्थर नही फेका करते, अशी डायलॉगबाजीही मुख्यमंत्री शिंदेंनी केली.
नागालँडमध्ये भाजपला आमचा पाठिंबा नाही
आमचा पाठिंबा भाजपला नसून नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, नागालँड राज्याच्या व्यापक हिताचा विचार करता त्याचसोबत राष्ट्रवादी आणि रिओ यांचे जुने संबंध पाहता या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये सर्वपक्षीय सरकार स्थापन झाले असून एकही पक्ष विरोधात बसायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी सांगितले.