मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 02:19 AM2021-01-15T02:19:58+5:302021-01-15T02:20:29+5:30

कौशल्याने प्रकरण हाताळण्याची खबरदारी

Two groups in the NCP over dhananjay Munde's resignation | मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट

मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट

Next

अतुल कुलकर्णी 
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी पक्षात मतमतांतरे आहेत. मुंडे हे अजित पवार गटाचे मानले जातात. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या समवेत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या भूमिकेवरून पक्षात तणाव निर्माण झाला होता. आता महाविकास आघाडीत आणि त्यातही राष्ट्रवादीत अजित पवार गटाकडून पुन्हा वेगळा विचार होऊ नये, यासाठी हा 
सर्व विषय कौशल्याने हाताळला जावा अशी ज्येष्ठ नेत्यांची मानसिकता आहे.

बलात्काराचा आरोप व विवाहबाह्य संबंधाची स्वतःच दिलेली कबुली, यामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला असताना भाजपचे मुंबई उपाध्यक्ष कृष्णा हेगडे यांच्या भूमिकेनंतर चित्र बदलले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असली तरी मुंडे यांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे संकेत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने आज दिले आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत शांत असणारे राष्ट्रवादीचे नेते अचानक आपली मते बोलून दाखवू लागले. त्याला कारण ठरले भाजपचे मुंबई उपाध्यक्ष माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्या विरोधात दिलेली तक्रार. मनसेचे नेते मनीष धुरी यांनी देखील आपल्याला सदर महिलेने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगितले. त्यानंतर  मुंडे यांच्या बाजूने अचानक वातावरण बदलू लागले. कोणताही निर्णय घेण्याआधी संपूर्ण चौकशी होऊ द्या, वस्तुस्थिती समोर आल्यानंतर निर्णय घ्या, असे आपण पक्ष नेत्यांना सांगितल्याचे काही आमदारांनी स्पष्ट केले. 

या विषयावर कोणीही मोकळेपणाने नावासह बोलायला तयार नाही; मात्र एक मंत्री म्हणाले, राजकारणात नाव मिळवण्यासाठी, मंत्री पदापर्यंत येण्यासाठी अनेक वर्षे घालवावी लागतात. कोणीतरी ब्लॅकमेल करून बदनाम करणार असेल तर ही प्रथा सर्वच पक्षांना घातक ठरेल. धनंजय मुंडे चुकले असतील तर जरूर शिक्षा करा, पण ब्लॅकमेल करणाऱ्यांच्या नादी लागून कोणाची राजकीय कारकीर्द संपवू नका, अशा भावना अजित पवार गटाच्या आमदार राम मधून पुढे येत आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  मुंडे यांची जोरदार पाठराखण केल्याचे समजते. शरद पवार यांना देखील अजित पवार आणि त्यांना मानणाऱ्या आमदारांना नाराज करायचे नाही त्यामुळे योग्य मार्ग काढण्याचे आव्हान त्यांच्यापुढे देखील आहे.

राजीनामा घेणार का? 
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री नवाब मलिक यांना क्लीनचिट दिली; मात्र मुंडे यांच्या विषयीच्या तक्रारी गंभीर आहेत, असे सांगितले. याचा अर्थ मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा जोरात सुरू झाली. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी असे तडकाफडकी काही होणार नाही. पक्षाच्या बैठकीत विचारविनिमय आणि योग्य ती चर्चा होऊन निर्णय होईल, असे सांगितल्यामुळे मुंडे यांचे नेमके काय होणार,  हा प्रश्‍न महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: Two groups in the NCP over dhananjay Munde's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.