उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला नमविले; सांगलीसह मुंबईतही वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 08:26 AM2024-04-10T08:26:53+5:302024-04-10T08:27:47+5:30
मविआचे जागावाटप : सांगलीची जागा हिसकावली, मुंबईतही वर्चस्व
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीत सर्वाधिक २१ जागा आपल्याकडे घेण्यात तसेच सांगलीची जागा काँग्रेसला न देता स्वत:कडेच राखण्यात उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यशस्वी ठरले. जागावाटप आणि इच्छेनुसार जागा मिळविणे या दोन्हींबाबत त्यांनी काँग्रेसवर मात केल्याचे दिसून आले.
महाविकास आघाडीत केवळ काँग्रेस हा एकच पक्ष असा आहे की ज्यात फूट पडलेली नाही. अन्य दोन मित्रपक्षांमध्ये उभी फूट पडली. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० आमदार घेऊन बाहेर पडले. फूट पडलेल्या दोन पक्षांना म्हणजे उद्धव सेना आणि शरद पवार गटास अनुक्रमे २१ आणि १० जागा मिळाल्या. काँग्रेसला १७ जागांवर समाधान मानावे लागले.
कुणाकडे कुठली जागा?
nउद्धव सेना : दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, मावळ, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, शिर्डी, जळगाव, परभणी, औरंगाबाद हिंगोली, उस्मानाबाद, बुलढाणा, यवतमाळ- वाशिम,
हातकणंगले, सांगली
nकाँग्रेस : नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, पुणे, उत्तर-मध्य मुंबई, उत्तर मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, लातूर
nशरद पवार गट : बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड
शिंदेंपेक्षा ठाकरे फायद्यात
nउद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत ४८ पैकी २१ जागा आपल्याकडे घेतल्या. भाजपसोबत महायुतीत असलेल्या शिंदेसेनेला आतापर्यंत दहाच जागा मिळालेल्या आहेत, काही जागा वादात आहेत.
nहिंगोलीचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दबावामुळे बदलल्याची खूप चर्चा झाली. दुसरीकडे ठाकरे हे सांगली आमच्याकडेच राहणार असे ठासून सांगत राहिले व ते त्यांनी खरेही करून दाखविले. बंडावेळी शिंदेंकडे मूळ शिवसेनेचे १३ खासदार आणि ४० आमदार गेले होते.
मुंबईतही ठाकरे
पडले भारी
उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आणि उत्तर-पूर्व मुंबई अशा सहापैकी चार जागा उद्धव सेना लढविणार आहे. गत लोकसभा निवडणुकीत सहापैकी पाच जागा लढविणारी काँग्रेस आता दोन जागांवर आली आहे. दक्षिण-मध्य व उत्तर-पश्चिम या जागांसाठी काँग्रेस आग्रही होती. दक्षिण-मध्यमध्ये मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना काँग्रेसला रिंगणात उतरवायचे होते; पण ही जागा अनिल देसाई यांच्यासाठी ठाकरेंनी घेतली. उत्तर मुंबईची जागा काँग्रेसला नको होती ती त्यांच्या गळ्यात पडली.