उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणं; भाजप म्हणतं, "विचारधारा पायात आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 08:37 PM2024-08-20T20:37:08+5:302024-08-20T20:38:17+5:30

राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे उपरणं गळ्यात घातल्याने भाजपकडून टीका करण्यात येत आहे.

Uddhav Thackeray has been criticized by the BJP for wearing the Congress flag at the Rajiv Gandhi Sadbhavana Divas event | उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणं; भाजप म्हणतं, "विचारधारा पायात आणि..."

उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणं; भाजप म्हणतं, "विचारधारा पायात आणि..."

Uddhav Thackeray : मुंबईकाँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं पाहायला मिळालं. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी हे उपरणं उद्धव ठाकरेंच्या गळ्यात घातलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ते काढून ठेवलं. त्यानंतर भाषणादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. मात्र आता भाजपकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आलाय.

मुंबईतील षणमुखानंद सभागृहात काँग्रेसचा सद्भावना दिवस कार्यक्रम पार पडला. सद्भभावना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेनिथल्ला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस नेते मंचावर उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातल्या उपरण्याने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतलं होतं. काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना काँग्रेसचे उपरणे घातले. काही वेळ उपरणं उद्धव ठाकरे यांनी गळ्यात ठेवलं होतं. त्यानंतर थोड्या वेळाने शरद पवार हे सभास्थळी आले. शरद पवार यांनी गळ्यात घातलेलं उपरण काढलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपरण बाजूला काढल्यानंतर भाई जगताप यांनी ते उपरणं गळ्यात ठेवा असा आग्रह करताना दिसले. मात्र भाषणाला उभं राहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात उपरणं नव्हतं.

यावरुन आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. "ज्या बाळासाहेब ठाकरे यांची सगळी हयात काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात गेली, ज्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करून शिवसेना स्थापन केली, रुजवली आणि वाढवली; त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे केवळ राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचे उपरणे गळ्यात घालून बसले आहेत. आपली मूळची विचारधारा काँग्रेसच्या पायात आणि काँग्रेसचे उपरणे स्वतःच्या गळ्यात, अशी अवस्था आता उद्धव ठाकरे यांची झाली आहे," असे भाजप नेते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

"मी आज खरंच काँग्रेसच्या कार्यक्रमाला आलो आहे हे बघायला स्वतःला चिमटा काढून पाहिला. काँग्रेसच्या कार्यक्रमाला असल्याने मी गळ्यात गमछा घातला. तुमचा आदर ठेवला, मान ठेवला. पण उद्या याचा नक्की फोटो येणार. तो फोटो यावा यासाठीच मी काँग्रेसचे गमछा गळ्यात घातला होता. मी इकडे तिकडे काय करतो त्यांच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray has been criticized by the BJP for wearing the Congress flag at the Rajiv Gandhi Sadbhavana Divas event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.