Uddhav Thackeray: "राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याशी मी सहमत नाही, पण..."; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:31 PM2022-11-17T12:31:34+5:302022-11-17T12:33:34+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
मुंबई-
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याबाबत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत शिवाजी पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मतिदिन आहे. यानिमित्तानं उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाला भेट दिली. बाळासाहेबांच्या स्मृतिला अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांवर आधारित आयोजित केलेल्या अर्कचित्र प्रदर्शनाला उपस्थिती लावली. याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
"राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाशी मी सहमत नाही. मी आजही स्पष्टपणे सांगू इच्छितो की सावरकरांबद्दल आदर, प्रेम, आपुलकी आमच्या मनात आहेच. ती कधीच पुसली जाणार नाही. पण जे लोक स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते त्यांना स्वातंत्र्यावीरांबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. स्वातंत्र्यलढ्यात तुमचे किती कार्यकर्ते होते हे आधी पाहावं मग सावरकरांवर बोलावं", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
देशाची वाटचाल पुन्हा गुलामगिरीकडे...
"विचारधारा आणि भूमिका यावर भाजपानं आम्हाला शिकवू नये. विचार व्यक्त करायला कृती असावी लागले. कृती नसेल तर विचार हा विचार राहत नाही. पीडीपीसोबत युती केलेल्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. खरंतर देशाची वाटचाल आता पुन्हा गुलामगिरीकडे होऊ लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना टिकणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. याविरोधात लढणं आता महत्वाचं झालं आहे. कारण या लोकांना संपूर्ण देशाचा ताबा हवा आहे. त्यासमोर स्मारकाच्या ताब्याचं काय घेऊन बसलात", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
"सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे", असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं. यावरुन राहुल गांधी यांच्यावर भाजपाकडून जोरदार टीका होत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"