मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 06:02 AM2024-11-28T06:02:15+5:302024-11-28T06:03:38+5:30

काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याने हिंदुत्ववादी विचारांच्या मतांवर परिणाम झाला आहे असं नेत्यांनी बैठकीत मत मांडले.

Uddhav Thackeray Sena desire to fight Mumbai Municipal Corporation on its own, its Shock Mahavikas Aghadi | मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा

मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा

सुरेश ठमके

मुंबई - मुंबई महापालिकेतील आगामी निवडणुकांबाबत आता मोर्चेबांधणी सुरू झाली असून, विधानसभेतील पराभवानंतर उद्धवसेनेने स्वबळाचा विचार सुरू केला आहे. तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र याबाबत सावध भूमिका घेतली आहे. 

महापालिकेच्या आगामी निवडणुकांना सामोरे जाताना उद्धवसेनेसमोर अस्तित्व टिकविण्याचा प्रश्न आहे. गेल्या निवडणुकीत ८४ जागा मिळवून पालिकेवर झेंडा फडकवला होता. आता सत्ता पुन्हा स्थापन करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करताना, ज्या गोष्टींमुळे नुकसान झाले आहे, त्याबाबत पुनर्विचार करावा, अशी भूमिका उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत स्वबळाबाबत विचार सुरू असल्याचे  उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.  

काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याने हिंदुत्ववादी विचारांच्या मतांवर परिणाम झाला आहे. हिंदुत्ववादी मतांचे विधानसभेत ध्रुवीकरण झाल्याने त्याचा फटका उद्धवसेनेला बसला असून पुन्हा हे घडू नये, यासाठी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांचा रेटा असून, काय निर्णय घेता येईल, याबाबत पक्षात विचार मंथन सुरू असल्याचे प्रवक्त्या संजना घाडी यांनी सांगितले. तर याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जरी तीव्र असल्या तरी अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींच्या स्तरावरच घेतला जातो. अद्याप याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. पक्षश्रेष्ठी एकत्र बसूनच याबाबत निर्णय घेतील, असे आ. अनिल परब यांनी स्पष्ट केले.

अद्याप चर्चा नाही : वर्षा गायकवाड 

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शिवसेनेने जर अशी भूमिका घ्यायची ठरवले असेल अथवा तशी  चर्चा सुरू असेल, तर त्याबाबत माझ्यापर्यंत अद्याप काहीही माहिती आलेली नाही. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, अद्याप पालिका  निवडणुकांची घोषणाही झालेली नाही. त्यामुळे अजून पालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा सुरू केलेली नाही. आत्ताच काहीही ठरवून निर्णय घ्यावा, अशी परिस्थितीही नाही. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर यथावकाश निर्णय घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Uddhav Thackeray Sena desire to fight Mumbai Municipal Corporation on its own, its Shock Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.