काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींचा दावा; "त्या रात्री फोन आला अन् मला २ तासांत..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:48 PM2024-08-21T12:48:48+5:302024-08-21T12:50:38+5:30

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे नुकतेच अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आले होते. 

Uddhav Thackeray Shiv Sena eyeing my Vandre east constituency, misbehavior from Congress - MLA Zeeshan Siddiqui | काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींचा दावा; "त्या रात्री फोन आला अन् मला २ तासांत..." 

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींचा दावा; "त्या रात्री फोन आला अन् मला २ तासांत..." 

मुंबई - मविआत मला त्रास दिला गेला. माझ्यावर अन्याय केला. मला जो निधी मिळायला हवा तो अनिल परबला दिला जायचा. सरकारी कार्यक्रमात मला बोलावले जात नव्हते. हे आधीपासून होतंय. शिवसेना उबाठाची ही जागा आम्ही काँग्रेसकडून जिंकलोय. परंतु आम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी वरिष्ठांकडून टार्गेट करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्र्याची या जागेवर नजर आहे असं काँग्रेस मंत्री मला सांगायचे. तुम्ही तुमच्या युवा आमदाराला सांभाळत नसेल तर तो कुठे जाईल? असा सवाल काँग्रेस नेतृत्वावर उपस्थित करत आमदार झिशान सिद्दीकी यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले की, जनता सुज्ञ आहे. कोण काम करतं, कोण नाही हे माहिती आहे. मागील अनेक वर्ष वांद्रे पूर्व मतदारसंघात उबाठाचा आमदार होता. मात्र काही काम केले नाही. पहिल्यांदा विकास होतोय त्यामुळे पुन्हा ही जागा मागावी असं उबाठाला वाटते. परंतु मी २०२४ ची निवडणूक लढणार आणि जिंकणारही. ज्यादिवशी वडील राष्ट्रवादीत गेले तेव्हा संजय राऊतांनीही वेगवेगळी विधाने केली. आम्हाला काही फरक पडणार नाही वैगेरे. वांद्रे पूर्व आमची जागा आहे. मात्र तेव्हा आम्ही काँग्रेस नेतृत्वाशी बोललो, ही जागा आपली आहे तुम्ही त्यांना सांगायला हवं असं त्यांनी सांगितले.

तसेच इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक माझ्या मतदारसंघात झाली होती. त्यावेळी मी सर्वात जास्त बॅनर्स लावले होते. काँग्रेस पक्षाचे होते, इंडिया आघाडीचे लावले त्यात उद्धव ठाकरे असतील किंवा इतर नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स होते. मात्र आदल्या रात्री मला माझ्या पक्षातील एका नेत्याने रागात फोन केला, मला २ तासांत सगळे बॅनर्स काढलेले हवेत असं म्हटलं. तेव्हा हा माझा मतदारसंघ आहे. मी जर कार्यकर्त्यांना बॅनर्स काढायला सांगितले तर चुकीचा मेसेज जाईल असं सांगितले. मात्र शिवसेना उबाठा या बॅनर्समुळे खुश नाहीत. तुम्हाला सगळे बॅनर्स काढावे लागतील असं मला नेत्याने सांगितले. नैसर्गिक आघाडी नसताना जो १४ वर्ष काँग्रेससोबत काम करतोय त्याला अशी वागणूक देणे चांगले नव्हते अशी नाराजीही झिशान सिद्दीकी यांनी बोलून दाखवली. 

दरम्यान,  महाराष्ट्रातील काँग्रेस नेते गेल्या अनेक दिवसांपासून मला कुठल्याही बैठकीला बोलवत नाहीत. सर्व व्हॉट्सग्रुपमधून काढलेले आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी यात्रा काढली मात्र त्याचेही निमंत्रण मला आले नाही. त्यामुळे हे सर्व संकेत स्पष्ट आहेत. काँग्रेस कार्यालय इच्छुकांकडून अर्ज घेत होते. मात्र आमच्या प्रतिनिधीला तो अर्जही दिला नाही. वडील वेगळ्या पक्षात, मुलगा वेगळ्या पक्षात अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र वैयक्तिक जर कुणी टार्गेट करत ते सहन करणार नाही. वांद्रे पूर्वचा मी काँग्रेस आमदार आहेत मात्र शिवसेना उबाठा ही जागा आमची आहे, आम्ही इथं लढणार हे सांगत आहे. जी जागा काँग्रेसनं जिंकली ती ते मागतायेत. काँग्रेस पक्षाकडे पाठिचा कणा असायला हवा ही आमची जागा आहे. तुम्हाला देणार नाही असं सांगायला हवं होते असंही झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं. 

Web Title: Uddhav Thackeray Shiv Sena eyeing my Vandre east constituency, misbehavior from Congress - MLA Zeeshan Siddiqui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.