“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 04:01 PM2024-07-02T16:01:37+5:302024-07-02T16:03:51+5:30

Uddhav Thackeray News: आमच्यापैकी कुणी हिंदुत्वाचा अपमान करणार नाही आणि झाला तर तो सहनही करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

uddhav thackeray support rahul gandhi statement on hindutva in lok sabha | “राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका

“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका

Uddhav Thackeray News: विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपा सदस्य प्रसाद लाड एका मुद्द्यावरून आमनेसामने आल्याचे मिळाले. तसेच अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंबादास दानवे आपल्या कृतीवर ठाम आहेत. या सर्व प्रकारावरून आता अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव आणण्याचा प्रयत्न आणि अंबादास दानवे यांचे निलंबन यांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे.

पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विधान परिषदेत जो ठराव आणू पाहत होते, तोच चुकीचा होता. तो ठराव आणू इच्छित होते, त्याचा या सभागृहाची संबंध काय, असाच प्रश्न आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी विचारला. हेही बाजूला ठेवा. मूळात राहुल गांधी काय बोलले होते, त्यांनी खरच हिंदुत्वाचा अपमान केला होता का? ते भाषण मी स्वतः पाहिले आहे. आमच्यापैकी कुणी हिंदुत्वाचा अपमान करणार नाही आणि सहनही करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही

राहुल गांधी यांनी सांगितले की, भाजपामध्ये हिंदुत्व नाही. संपूर्ण देशात भाजपा म्हणजेच हिंदू, असे नाही, हे माझेही ठाम मत आहे. मी मागेही सांगितले आहे की, मी भाजपाला सोडले आहे. हिंदुत्व सोडलेले नाही. हिंदुत्व सोडणे कदापि शक्य नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारावर राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव आणणे चुकीचे आहे. असत्याच्या आधारे ठराव आणणे आणि बहुमताच्या जोरावर तो पास करून तो मंजूर करून पाठवणे हा सभागृहाचा अपमान आहे. त्या सदस्याला तुम्ही निलंबित करणार आहात का, असा सवाल करत, राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात आले आहे. असा कोणताही प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्यावर समोरच्या व्यक्तीला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. अशी बाजू मांडल्यानंतर सभापतींनी निर्णय घेतला तर ठीक आहे. मात्र दानवे यांना आपली बाजूही मांडू दिली गेली नाही. जणू काही ठरवूनच हे सगळे करण्यात आले आणि षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित करण्यात आले. विधान परिषद निवडणुकीत आमचा झालेला विजय झाकोळून जावा, यासाठी हा निलंबनाचा निर्णय घेण्यात आला असावा. या सरकारने बोगस अर्थसंकल्प मांडला आहे. हा अर्थसंकल्प फसवा असल्याने आम्ही त्याची चिरफाड करण्यास सुरुवात केल्यानंतर चर्चेला वेगळे वळण देण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांचे निलंबन करण्यात आले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
 

Web Title: uddhav thackeray support rahul gandhi statement on hindutva in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.