“सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करा”; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 02:54 PM2024-04-03T14:54:05+5:302024-04-03T14:54:39+5:30
Uddhav Thackeray News: अनेक जागांवरून शिवसैनिकही नाराज आहेत. मात्र, मी त्यांना समजावले आहे. आम्ही काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Uddhav Thackeray News: सांगलीचा उमेदवार आम्ही जाहीर केला आहे. तसेच आताही चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे. लवकरच संजय राऊत तिथे जाणार आहेत. आम्ही तिथे प्रचाराला सुरुवात करणार आहोत. अन्य ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत. पण काँग्रेसचे उमेदवार आहेत. पूर्व विदर्भात आमच्याकडे एकही जागा नाही. त्या भागातील शिवसैनिक नाराज आहेत. पण, मी शिवसैनिकांना समजावले आहे. त्यानुसार शिवसैनिकांनी काँग्रेसचा प्रचार सुरू केला आहे. तसा सांगलीसह जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत, तिथे काँग्रेसने प्रचाराला सुरुवात करावी, असे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिशय शब्दांत सांगितले आहे.
उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी मुंबईत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली, हातकणंगले, जळगाव आणि पालघर या चार ठिकाणी उमेदवारांची घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना सांगलीच्या जागेबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा स्पष्ट शब्दांत अल्टिमेटम दिला.
सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करा
सांगलीच्या जागेचा पुनर्विचार होणार नाही. अमरावतीसह अन्य ठिकाणचे शिवसैनिकही नाराज आहेत. आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत. सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करावी, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला थेटपणे सांगितले आहे. यावर, मैत्रीपूर्ण लढत होणार का, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढत होत नाही. एकतर मैत्री करा किंवा थेट लढत द्या, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी अशा भाषेत बोलू नये. आम्हाला अजूनही त्यांच्याकडून आशा आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊ शकतो. एकत्रितपणे लढा देऊ शकतो. आज एकत्र आलो नसलो तरी भविष्यात एकत्र येऊ शकतो. कृपा करून आमच्यावर टीका करू नका. तुम्ही आमच्यावर टीका केली, तरी मी प्रत्युत्तर देणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेला आम्ही उत्तर दिले नाही. आम्ही पलटवार करू शकत नाही, असे नाही. परंतु, शिवसैनिकांनाही सांगितले आहे की, प्रकाश आंबेडकरांवर टीका करू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.