उद्धव ठाकरेंनी सांगितला पुढचा मार्ग; विधानसभा अध्यक्षांवर संताप, शिंदेंवरही निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 08:42 PM2024-01-10T20:42:46+5:302024-01-10T20:44:03+5:30
उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांवर संताप व्यक्त केला, तर मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधला.
मुंबई - आमदार अपात्रता आणि सत्तासंघर्षाचा निकाल अखेर जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अगोदर खरी शिवसेना कोणाची हे मी सांगेन, कोणाचा पक्ष खरा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून मला असल्याचंही म्हटलं. दरम्यान, शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, आमदार अपात्रतेसंदर्भातही त्यांनी निर्णय दिला. त्यानुसार, सर्वच आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे. मात्र, ठाकरे गटाचा व्हीप अमान्य केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या निकालावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने तीव्र संताप व्यक्त केला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांवर संताप व्यक्त केला, तर मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधला.
शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून आम्हाला घटना प्राप्त न झाल्याने आम्ही ती घटना निवडणूक आयोगाकडून घेण्यात आल्याचे नार्वेकर यांनी म्हटले. त्यांनी सर्वोच्च न्यायालय, दोन्ही बाजुचे वकील आणि विधानसभेतील अधिकाऱ्यांचे आभार मानले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास निकाल वाचनाला सुरुवात झाली. संपूर्ण राज्याच्या नजरा निकालाकडे लागल्या होत्या. त्यामुळे, विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. निकालाआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहे. हा निकाल मॅच फिक्सिंग असेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. तर, उद्धव ठाकरेंनीही कालच्या विधानाचा संदर्भ देत आरोपीने अगोदरच विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्याची आठवण करुन दिली.
अध्यक्ष निकालापूर्वीच आरोपीला भेटले होते, त्यामुळे निकालाबाबत मी कालच भाष्य केलं होतं, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नार्वेकरांनी नीचपणाचा कळस गाठला आहे. आमची घटना अवैध, मग आमचे आमदार पात्र कसे, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करून आपण शिवसेना संपवू, असं त्यांना वाटत होतं. पण शिवसेना काही संपणार नाही. शिवसेना शिंदेंची होऊच शकत नाही. शिवसेना कोणाची हे ठरवेणारे नार्वेकर कोण?. नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. नार्वेकर कोर्टालाही जुमानत नाहीत, हे या निकालावरुन सिद्ध झालं आहे. त्यामुळे, त्यांच्याविरुद्ध अवमानयाचिका दाखल करता येते का, ते आम्ही पाहणार आहोत. तसेच, हा निकाल अंतिम नसून आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार निशाणा
आजही त्यांच्यात हिंमत नाही, ते स्वतःच्या ताकदीवर मतं मागू शकत नाहीत; म्हणून त्यांना माझा पक्ष आणि वडिलांचा चेहरा लागतो. मिंध्यांची, गद्दारांची शिवसेना... महाराष्ट्रातली आणि देशातली जनता मानणार नाही. मिंध्यांना वाटत असेल त्यांनी घराणेशाही मोडीत काढली, तर त्यांनी लक्षात ठेवावं त्यांची गुलामगिरी सुरु झाली आहे, असे म्हणत शिंदेंच्या प्रतिक्रियेवरही उद्धव ठाकरेंनी पलटवारही केला. दरम्यान, एकनाथ शिदेंनी निकालावर प्रतिक्रिया देताना आम्ही घराणेशाही मोडीत काढली, असे म्हटले होते.
शरद पवारांचाही विधानसभा अध्यक्षांवर निशाणा
''सत्ताधाऱ्यांनी निकालाबाबत आधीच भाष्य केलं होतं, त्यानुसारच हा निर्णय आला आहे. अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल,'' असे शरद पवार यांनी म्हटलं. व्हीप बजावण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिलं. तर, व्हीप देण्याबाबात पक्ष संघटना महत्त्वाची, असं कोर्टाने म्हटले होतं. त्यामुळे, येथे सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वे डावलण्यात आली आहेत. आता, ठाकरेंना कोर्टात जावं लागेल, असेही शरद पवार यांनी म्हटले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा, हा निर्णय दिला. मात्र, हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे, असे म्हणत शरद पवार यांनी एका वाक्यातच विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
काय म्हणाले अध्यक्ष
शिंदेचा गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी त्यांनी पक्षप्रमुख म्हणून सर्वस्वी अधिकार कोणालाही देता येणार नाही, असेही म्हटले. अध्यक्षांचा हा निर्णय शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो. आता, आमदार अपात्रतेसंदर्भातही लवकरच निर्णय जाहीर होईस. दरम्यान, निकालाची प्रत सर्वांना दिली जाणार असल्याचेही नार्वेकरांनी स्पष्ट केले.