...तर अशा लोकांना भरचौकात फटकावले पाहिजे; उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 04:29 PM2019-08-23T16:29:01+5:302019-08-23T16:30:35+5:30
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकरांचे योगदान मोठे होते.
मुंबई - दिल्ली विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे पडसाद मुंबईतही उमटले आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी या घटनेवर आक्रमक भूमिका घेत जे कोणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही अशांना भर चौकात फटकावले पाहिजे अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीतील या घटनेवर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकरी पिकविम्याबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी दिल्लीतील घटनेबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला त्यावर उद्धव यांनीही नाराजी व्यक्त करत अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
तसेच सावरकर पुतळ्याच्या विटंबनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकरांचे योगदान मोठे होते. त्यांच्याबाबत असे कृत्य करणे वाईट आहे. सावरकरांचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे. कुठेही कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्व समाजाने काळजी घेतली पाहिजे असं मत त्यांनी मांडले.
दिल्लीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. मात्र काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही केली आहे.
दिल्ली विद्यापीठात शहीद भगतसिंग, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. मात्र सावरकरांच्या पुतळ्याला एनएसयूआयने आक्षेप घेतल्याने विद्यापीठात तणावाची परिस्थिती होती.
दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पिक विमा कंपन्यांवर शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेमध्ये घोटाळा होत असून, अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच या योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
"जर विमा कंपन्या या योजनेमध्ये काही चालबाजी करत असतील तर हा सरकारने दिलेला शेतकर्यांसाठीचा पैसा सरकारने परत घ्यावा आणि शेतकर्यांना तो वाटावा."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) August 23, 2019
- शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/K5vTrzfQtT
या योजनेच्या प्रामाणिकतेबाबत उद्धव ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या पिकविमा योजनेत 53 लाख शेतकरी पात्र तर 90 लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले. यापैकी 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी मदत शिवसेनेमुळे झाली. मात्र शेतकऱ्यांना देणे असलेले 2000 कोटी रुपये कंपन्यांकडे अजून पडून आहेत. पिकविमा योजनेमध्ये दोन टक्के रक्कम शेतकरी भरतात, तर उर्वरित 98 टक्के रक्कम सरकारकडून दिली जाते. मात्र विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. या योजनेतील संपूर्ण लाभ शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. सरकारने कंपन्यांना त्यांचा नफा ठरवून द्यावा. हा पैसा सरसकट मिळावा नाहीतर सरकारने तो पैसा परत घेऊन आपल्या यंत्रणेतून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा. ही योजना म्हणजे विमा कंपनी बचाव योजना नाही. '' असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
"खरीप २०१८ मोसमासाठी १ कोटी ४४ लाख शेतकर्यांनी अर्ज भरले होते विम्यासाठी, त्यात साधारण ५३ लाख शेतकरी पात्र ठरवले गेले आणि ९० लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) August 23, 2019
- शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे. pic.twitter.com/7gzCMTLpBz