छोटा राजनची जन्मठेप रद्द; जया शेट्टी हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:52 PM2024-10-23T12:52:26+5:302024-10-23T13:17:41+5:30
Chhota Rajan Bail : मुंबई उच्च न्यायालयाने गँगस्टर छोटा राजनला मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.
Gangster Chhota Rajan : मुंबईउच्च न्यायालयाने गँगस्टर छोटा राजनला मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला. २००१ मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. हत्या प्रकरणात छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र आता मुंबईउच्च न्यायालयाने छोटा राजनची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे. त्यामुळे छोटा राजनला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टींच्या हत्येप्रकरणी गँगस्टर छोटा राजनला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली. तसेच, या खून प्रकरणात उच्च न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन राजनला जामीन मंजूर केला आहे. जया शेट्टी हे मध्य मुंबईतील गामदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालक होते. त्यांना छोटा राजन टोळीकडून खंडणीच्या धमक्या येत होत्या. ४ मे २००२ रोजी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर छोटा राजन टोळीच्या दोन सदस्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. ३० मे २०२४ रोजी विशेष मकोका न्यायालयाने राजनसह इतरांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता ही जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने छोटा राजनला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामीन मिळाला असला तरी छोटा राजनला आणखी एका गुन्हेगारी खटल्यात तुरुंगात राहावं लागणार आहे. मे महिन्यात विशेष न्यायालयाने राजनला हॉटेलचालकाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात राजनने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. शिक्षेला स्थगिती आणि अंतरिम जामीन मंजूर करण्याची विनंती छोटा राजनने केली होती.
जया शेट्टी यांची खंडणीसाठी छोटा राजनच्या साथीदारांनी हॉटेलमध्येच गोळ्या झाडून हत्या केली. छोटा राजन टोळीचा सदस्य हेमंत पुजारी याच्याकडून शेट्टीला खंडणीचे फोन आले होते आणि पैसे न दिल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर जेडेंच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला राजन सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे.