"लोक तांत्रिकांकडे जातात हे दुर्दैव", तांत्रिकाची जन्मठेप कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 12:27 PM2024-03-03T12:27:51+5:302024-03-03T12:28:38+5:30
न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. ४५ वर्षीय तांत्रिकाला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. हे अंधश्रद्धेचे विचित्र प्रकरण असून आरोपीला कोणताही दिलासा देणे योग्य नाही, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने म्हटले.
मुंबई : लोक समस्येचे निराकरण करण्यासाठी तांत्रिक, बाबांचे दरवाजे ठोठावतात, हे आपल्या काळातील दुर्दैवी वास्तव आहे, असे उच्च न्यायालयाने सहा गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तांत्रिकाची जन्मठेपेची शिक्षा कायम करताना म्हटले.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. ४५ वर्षीय तांत्रिकाला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. हे अंधश्रद्धेचे विचित्र प्रकरण असून आरोपीला कोणताही दिलासा देणे योग्य नाही, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने म्हटले.
सहा गतिमंद मुलींना सामान्य मुलींप्रमाणे करण्याचे आमिष दाखवून आरोपीने सहा मुलींवर बलात्कार केला. त्यांना बरे करण्यासाठी त्याने सहाही मुलींच्या पालकांकडून १.३० कोटी रुपये उकळले. २०१० मध्ये पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. २०१६ मध्ये सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपीने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयानेही त्याला दोषी ठरवत सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम केली.
अंधश्रद्धेचा गैरफायदा
‘अंधश्रद्धेच हे एक विचित्र प्रकरण आहे. हे तथाकथित तांत्रिक, बाबा लोकांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेतात. त्यांचे शोषण करतात,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. ‘तांत्रिक, बाबा लोकांच्या असुरक्षिततेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळतात. अनेकवेळा उपाय सांगण्याच्या नावाखाली पीडितेवर लैंगिक अत्याचार करतात,’ असे न्यायालयाने म्हटले आहे.