Union Budget 2025 : 'देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प'; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:19 IST2025-02-01T16:05:37+5:302025-02-01T16:19:55+5:30
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर केला, सीतारमण यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Union Budget 2025 : 'देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प'; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
Union Budget 2025 ( Marathi News ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर केला, सीतारमण यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली.
तेव्हा शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली..! छगन भुजबळ यांचा आरोप
अजित पवार म्हणाले,“केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पातील नव्या कररचनेमुळे १२ लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना ८० हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के करमाफी मिळणार आहे. १८ लाख उत्पन्नधारकांना ७० हजारांचा फायदा होणार आहे. २५ लाख उत्पन्न असलेल्यांचा कर १ लाख २५ हजारांनी कमी होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांहून 1 लाख करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील ३६ जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्याने ही औषधे स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन देखील स्वस्त होणार असल्याने देशातील प्रत्येक घराला, व्यक्तीला या निर्णयाचा लाभ होईल. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांसाना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार,” असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पातू महाराष्ट्राला हे मिळाले
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी-३ प्रकल्पासाठी १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत २३० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी ४ हजार ३ कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी १२६ कोटी ६० लाख, मुंबई मेट्रोसाठी १६७३ कोटी ४१ लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळ सुधारणांसाठी ६८३ कोटी ५१ लाख, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी ५९६ कोटी ५७ लाख, ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी १८६ कोटी ४४ लाख, इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी ६५२ कोटी ५२ लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी १०९४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार मानले आहेत.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, देशातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी, प्रत्येक समाजघटकाला बळ मिळणार आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला बळ मिळणार आहे. अर्थसंकल्पात विविध वस्तू-सेवांवरील सात प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या वस्तू-सेवा स्वस्त होतील. देशात तयार होणारे कपडे, चामड्याच्या वस्तू, मत्स्योत्पदनांवरील शुल्क कमी झाल्याने महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यानी व्यक्त केला.