"अकारण वाद, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्यांना याच्याशी देणंघेणं नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 08:52 AM2023-01-04T08:52:59+5:302023-01-04T09:12:33+5:30
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे. राज्यात अकारण वाद निर्माण केले जात आहेत.
मुंबई - राज्यात महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानं करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. आधी एका पक्षाच्या नेत्याने विधान करायच आणि मग दुसऱ्या पक्षाचे त्याविरुद्ध आंदोलन करत रस्त्यावर उतरतात. त्यानंतर, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यानं विधान करायचं आणि मग त्याविरोधातील पक्ष निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरतो. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. आता, अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरुन भाजपचे लोकं आंदोलन करत आहेत. मात्र, सर्वसामान्य लोकांना खरंच या वादात रस आहे का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे. राज्यात अकारण वाद निर्माण केले जात आहेत. मूळ मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा वाद निर्माण केला जात असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं आहे. ''मूळ समस्येवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रात अकारण वाद निर्माण केले जात आहेत का? याचा जनतेने गांभीर्याने विचार करायला हवा.दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्याना याच्याशी देणं घेणं नाही, हे तुडुंब पोट भरलेल्या लोकांचे वाद आहे, अशीच त्यांची भावना आहे.'', असे ट्विट देशपांडे यांनी केले आहे.
मूळ समस्येवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रात अकारण वाद निर्माण केले जात आहेत का ?याचा जनतेने गांभीर्याने विचार करायला हवा.दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्याना याच्याशी देणं घेणं नाही ,हे तुडुंब पोट भरलेल्या लोकांचे वाद आहे अशीच त्यांची भावना आहे .
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 4, 2023
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विधान करताना ते धर्मवीर नव्हते स्वराज्यरक्षक होते, असे म्हटले आहे. त्यानंतर, भाजप नेत्यांनी अजित पवारांविरुद्ध आंदोलन सुरू केलं आहे. तसेच, काहींनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यातच, जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबद्दल विधान करताना तो क्रूर नव्हता, असे म्हटले. त्यावरुनही वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियवरही याचे पडसाद दिसत आहेत. मात्र, केवळ राजकीय पक्षाचे समर्थकच एकमेकांना भिडताना दिसत आहेत. मात्र, सर्वसामान्य लोकांना या वादाचं देणं घेणं आहे का, हा खरा प्रश्न आहे. मनसेच्या देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये या वादाच कुठेही उल्लेख केला नाही. पण, राज्यात अकारण निर्माण होत असलेल्या अशा वादावरच त्यांनी भाष्य केलं आहे.