...तोपर्यंत आरेतील एकही झाड कापू नका; हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 10:01 PM2019-09-17T22:01:56+5:302019-09-17T22:04:41+5:30
मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्ष तोडीला अनेक स्तरावरुन विरोध दर्शवत पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
मुंबई: मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्ष तोडीला अनेक स्तरावरुन विरोध दर्शवत पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. कारशेड उभारण्यासाठी आरेतील वृक्ष कापले जाऊ नयेत, यासाठी शिवसेना, मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरेमधील मेट्रो कारशेडवरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील वृक्षतोडीवरुन होणाऱ्या विरोधाची दखल घेतली आहे.
मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील अनेक वृक्ष तोडण्यात येणार असल्याने अनेक दिवसांपासून आंदोलन करुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील वृक्षतोडीवरुन होणाऱ्या विरोधाची दखल घेत मेट्रो कारशेडसाठी आरेमधील 30 सप्टेंबरपर्यत एकही झाड कापू नका असे मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला आदेश दिले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या आदेशामुळे पर्यावरणप्रेमींना थोडा दिलासा मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणाने मेट्रोसाठी आरेतील २६०० झाडे तोडण्याची आणि आणि 461 झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यासाठी मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र, महापालिकेच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते झोरू बथेना यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे आज( मंगळवारी) झोरू बथेना यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनला (एमएमआरसी) मेट्रो कारशेडसाठी आरेमधील एकही झाड 30 सप्टेंबरपर्यत कापू नकाहे आदेश दिले. तसेच याप्रकरणी कोर्टात एकूण १२ याचिका सादर करण्यात आल्या असून ३० सप्टेंबरपासून आठवडाभर या याचिकांवर सुनावणी होणार आहे.
The judges also said that they plan to personally visit Aarey to see what the issue is, 'as sometimes it may be necessary to personally see the site to ascertain the facts in such critical matters of environment.' https://t.co/Q11djPBApY
— ANI (@ANI) September 17, 2019
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध केला असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुखांनीही या कारशेडविरोधात सूर आळवला असून, नाणारचे जे झाले तेच आरेचे होणार असे म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरे येथील मेट्रो कारशेडला विरोध केला. ''काही काळापूर्वी नाणार प्रकल्पाबाबात असाच आग्रह धरण्यात आला होता. मात्र त्याचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. आता जे नाणारचे झाले तेच आरेचे होणार आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.
तसेच आरेमधील वृक्षतोडीविरोधात मनसेने अनेकदा आंदोलनं केली आहेत. यातच पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरणाने आरेतील झाडे तोडण्याची परवानगी दिल्याने शर्मिला ठाकरे व अमित ठाकरे यांनी आरेमधील वृक्ष कापण्याचा विरोध करण्यात येणाऱ्या आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले होते.