उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 02:54 PM2019-09-10T14:54:56+5:302019-09-10T14:55:16+5:30
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा
मुंबई: काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना दिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई न झाल्यानं काँग्रेसला रामराम करत असल्याचं मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
Actor-turned-politician Urmila Matondkar resigns from the Congress party. She states 'My political and social sensibilities refuse to allow vested interests in the party to use me as a mean to fight petty in-house politics instead of working on a bigger goal in Mumbai Congress.' pic.twitter.com/QJdUIswMJk
— ANI (@ANI) September 10, 2019
उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम केलं नाही. या कार्यकर्त्यांची तक्रार मी मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे केली होती. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याउलट त्यांनाच पदं देण्यात आली नाही, अशा शब्दांमध्ये मातोंडकर यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
मला पक्षांतर्गत राजकारणात कोणताही रस नाही. त्यामुळेच मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं मातोंडकर म्हणाल्या. 'काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी मी मिलिंद देवरा यांच्याकडे पत्रातून केल्या होत्या. ते पत्र गोपनीय राहणं आवश्यक होतं. मात्र ते पत्र माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आलं. यानंतरही अनेकदा मी नाराजी व्यक्त केली. परंतु त्याची कोणतीही दखल घेण्याचत आली नाही. पक्षांतर्गत राजकारणात मला काडीमात्र रस नाही. त्या राजकारणात माझा वापर होऊ नये, यासाठी मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे,' अशा शब्दांमध्ये उर्मिला यांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावर जोरदार टीका केली. आपण सामाजिक कार्यात यापुढेही सक्रीय राहू, असं मातोंडकर यांनी स्पष्ट केलं.