मूल्य १०४ कोटींचे, विक्री ६३ कोटींत, जरांडेश्वरसाठी संस्थापक हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 08:03 AM2023-09-07T08:03:05+5:302023-09-07T08:03:16+5:30

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रांच्या कंपनीने केली होती खरेदी

Value 104 Crores, Sale 63 Crores, Founding High Court for Jarandeshwar | मूल्य १०४ कोटींचे, विक्री ६३ कोटींत, जरांडेश्वरसाठी संस्थापक हायकोर्टात

मूल्य १०४ कोटींचे, विक्री ६३ कोटींत, जरांडेश्वरसाठी संस्थापक हायकोर्टात

googlenewsNext

मुंबई : जरांडेश्वर साखर कारखान्याचा ताबा पुन्हा मिळविण्यासाठी कारखान्याच्या संस्थापक शालिनी पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर  ईडीची टांगती तलवार ठेवण्यास कारणीभूत ठरलेला हाच तो साखर कारखाना आहे.     

जरांडेश्वर साखर कारखाना  अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मालकीच्या गुरू कमॉडिटीज कंपनीने २०१० मध्ये लिलावाद्वारे कवडीमोल भावात खरेदी केला. या साखर कारखान्याच्या व्यवहारात अनियमितता व बेकायदेशीर बाबी असल्याचे ईडीच्या तपासातून निष्पन्न झाल्याने साखर कारखाना मूळ मालकाच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करणारी याचिका साखर कारखान्याच्या संस्थापक शालिनी पाटील यांनी ॲड. विनोद सांगवीकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे.  अजित पवार महाराष्ट्र सहकार बॅंकेचे संचालक असताना त्यांनी लाखो रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या गुरू कमॉडिटीजला अब्जावधींची किंमत असलेला जरांडेश्वर साखर करखाना नियम धाब्यावर बसवून विकण्यात आला, असे याचिकेत म्हटले आहे.

२००४ पर्यंत कारखान्याचा कारभार सुरळीतपणे सुरू होता. मात्र, २००५ च्या दुष्काळामुळे साखर कारखाना नुकसानीत गेला. त्यानंतर कारखाना भाड्याने देण्यात आला आणि २०१० मध्ये लिलावात काढण्यात आला. या कारखान्याची किंमत यंत्रसामग्री व भूखंडासह  एक अब्ज तीन कोटी ३१ लाख ६० हजार रुपये इतकी असूनही ६३ लाखांची वार्षिक उलाढाल असलेल्या गुरू कमॉडिटीजला अवघ्या ६२.७५ कोटी रुपयांना विकण्यात आली. निविदेमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून साखर कारखाना गुरू कमॉडिटीजला विकण्यात आला, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सहकार चळवळीवर सकारात्मक परिणामांची अपेक्षा    
गुरू कमॉडिटीजने बेकायदेशीर व्यवहार करून कारखाना खरेदी केल्याचे ईडीने केलेल्या तपासाद्वारे उघडकीस आले आहे. त्यामुळे ईडीने जप्त केलेला कारखाना आणि त्याची मालमत्ता पुन्हा मूळ मालकाच्या ताब्यात द्यावी. त्यामुळे सहकार चळवळीवर सकारात्मक परिणाम होईल. शेती व्यवसायाला चालना मिळेल, असे याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Value 104 Crores, Sale 63 Crores, Founding High Court for Jarandeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.