मविआ बैठकीचं ऐनवेळी निमंत्रण; प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर भडकले, ठेवली नवी अट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 03:47 PM2024-01-25T15:47:24+5:302024-01-25T15:58:05+5:30
ऐनवेळी पाठवण्यात आलेल्या निमंत्रणानंतर प्रकाश आंबेडकर चांगलेच संतापले आणि त्यांनी एक खरमरीत पत्र लिहीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे.
Prakash Ambedkar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. अशातच आज होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सकाळी प्रकाश आंबेडकर यांना पत्राद्वारे निमंत्रण पाठवलं. ऐनवेळी पाठवण्यात आलेल्या या निमंत्रणानंतर आंबेडकर चांगलेच संतापले आणि त्यांनी एक खरमरीत पत्र लिहीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या अध्यक्षांच्या सहीचे किंवा काँग्रेसकडून खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून निमंत्रण येईल तेव्हा बैठकीला येऊ, अशी अट प्रकाश आंबेडकरांनी ठेवली आहे.
नाना पटोले यांचा समाचार घेत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, "नाना पटोले हे एकतर महाराष्ट्रातील जनतेसोबत माइंड गेम खेळत आहेत किंवा त्यांच्या मेंदूत काहीतरी लोचा झाला आहे. कारण निवडणुका घोषित झाल्यानंतर वंचितला इंडिया आघाडीत सहभागी करून घेतलं जाईल, असं काही दिवसांपूर्वी पटोले यांच्यासमोरच काँग्रेसचे राज्य प्रभागी रमेश चेन्निथला यांनी म्हटलं होतं. मग असं असताना पटोले यांनी आज आम्हाला बैठकीचं निमंत्रण कसं पाठवलं? खरंच पटोले यांना असे निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत का?" असे सवाल विचारत प्रकाश आंबेडकर यांनी पटोलेंचा समाचार घेतला आहे.
दरम्यान, "आजच्या निमंत्रण पत्रावर पटोले यांच्यासह ज्या इतर दोन नेत्यांनी सह्या केल्या आहेत त्या जयंत पाटील आणि संजय राऊत यांनी मला याआधीच सांगितलं आहे की, काँग्रेस हायकमांडने अद्याप महाराष्ट्रातील जागावाटपाच्या चर्चेत तुम्हाला सहभागी करून घेण्याची सहमती दर्शवलेली नाही," असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
My reply — pic.twitter.com/c0gBi6I96C
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 25, 2024
आंबेडकरांना पाठवलेल्या पत्रात पटोलेंनी काय म्हटलंय?
प्रकाश आंबेडकर यांना मविआच्या आज होत असलेल्या बैठकीचं निमंत्रण देत नाना पटोले यांनी म्हटलं होतं की, "देश अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे. आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकूमशाहीविरोधात खंबीरपणे आवाज उठवत आहात. देश व संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकूमशाहीविरुद्ध लढा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून दिनांक २५ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत 'वंचित' आघाडीने सहभागी व्हावे, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. कृपया 'वंचित'तर्फे महत्त्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे ही विनंती," असं पटोले यांनी आपल्या पत्रात नमूद केलं होतं.