महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेससोबत निघालेल्या उद्धव ठाकरेंबद्दल सावरकरांचे नातू म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 08:48 PM2019-11-15T20:48:07+5:302019-11-15T20:50:04+5:30
राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी विचारसरणीचे पक्ष आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद अडीज अडीज वर्षे वाटून घेण्याचा प्रस्ताव भाजपाने नाकारल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीची कास धरली आहे. यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी वक्तव्य केले आहे.
राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली आहे. शिवसेनाहिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी विचारसरणीचे पक्ष आहेत. तरीही शिवसेना समविचारी भाजापाला सोडून या पक्षांसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढविले जात असताना रणजित सावरकर यांनी टिप्पणी केली आहे.
शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करत असल्यावर सावरकर म्हणाले की, मी जेवढे उद्धव ठाकरे यांना ओळखतो, ते कधीही हिंदुत्ववादी विचारसरणी सोडणार नाहीत. याचबरोबर सरकारसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणीही ते मागे घेणार नाहीत. उलट मला विश्वास आहे की, शिवसेना हिंदुत्वाबाबतची काँग्रेसची भूमिकाच बदलेल.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एक नवी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. या विरोधात हिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांनी याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रात भाजप व शिवसेना या पक्षांची निवडणूकपूर्व युती होती. हिंदुत्वाच्या मुद्यांवर या दोन्ही पक्षांनी मतदारांकडे मते मागितली. या युतीला पूर्ण बहुमत मिळाल्याने त्यांनीच सत्ता स्थापन करणे आवश्यक असताना शिवसेनेने केवळ सत्ता मिळवण्यासाठी दुसऱ्या पक्षांसोबत जाण्याचा विचार सुरू केला आहे. हा प्रकार म्हणजे मतदारांशी द्रोह असल्याचा दावा प्रमोद जोशी यांनी केला आहे. शिवसेनेची ही भूमिका नैतिकतेला धरून नसल्याने सर्वोच्च न्यायलायत या पक्षांच्या आघाडीच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्याचे जोशी यांनी सांगितले.