Video: काँग्रेसचा तीव्र संताप... "महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमधील अंबानींच्या पार्कमध्ये नेणे खेदजनक"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 06:21 PM2022-05-19T18:21:26+5:302022-05-19T18:38:25+5:30

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी ट्विटरवरुन पोस्ट केली आहे.

Video: Congress angry ... Elephants from Maharashtra run away in Ambani's new park in Gujarat | Video: काँग्रेसचा तीव्र संताप... "महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमधील अंबानींच्या पार्कमध्ये नेणे खेदजनक"

Video: काँग्रेसचा तीव्र संताप... "महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमधील अंबानींच्या पार्कमध्ये नेणे खेदजनक"

googlenewsNext

मुंबई - कमलापूर येथील वन विभागाच्या हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या ८ पैकी ४ आणि पातानिल व ताडोबा येथील ९ असे १३ हत्ती जामनगरातील (गुजरात) राधे कृष्णा टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे सोपविण्यासाठी अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने यासंदर्भात बुधवारी ११ मे रोजी दुपारी पत्र जारी केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील हत्ती गुजरातला नेण्यात येत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील हत्ती गुजरातला पळवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी ट्विटरवरुन पोस्ट केली आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमधील अंबानींच्या नवनिर्वाचित पार्कमध्ये घेऊन जाणे खेदजनक आहे. महाराष्ट्रातील अभयारण्याची ओळख पुसण्याचे हे काम आहे. तात्काळ पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेऊन हे थांबवण्यात यावे, अशी मागणी कुणाल राऊत यांनी केली आहे. कुणाल यांनी आदित्य ठाकरेंना यासंदर्भात पत्रही लिहिले आहे. 


महाराष्ट्रात केरळप्रमाणे हत्तींची संख्या लक्षणीय नाही. तरीही महाराष्ट्रातील हत्तींना गुजरातला नेण्याचं कारण काय हे समजण्यापलिकडं आहे. ताडोबा, पातानील, कमलापूर हा आदिवासी बहुल भाग आहे. आदिवासींच्या रुढी-परंपरांनुसार जल-जमीन-जंगल हेच त्याच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. एवढं असतानाही त्यांच्या जिल्ह्यातील प्राणी गुजरातला नेण्याचं षडयंत्र का केलं जात आहे. जर हत्तीची देखभाल करण्याची आपली परिस्थिती नसेल, तर महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेला हा एकप्रकारे धक्काच आहे, असेही कुणाल राऊत यांनी पर्यटनमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, सध्या विदर्भातील हे हत्ती ट्रकमधून स्थलांतरीत करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच, नेटीझन्सकडून हा फोटो शेअर करत महाविकास आघाडी सरकारला जाबही विचारण्यात येत आहे. 

काय आहे वाद

कमलापुरातील हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या सर्व हत्तींच्या हस्तांतरणावरून मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यावर मध्यमार्ग काढत आता तेथील ८ पैकी फक्त अशक्त असलेले चारच हत्ती नेण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. उर्वरित चार सुदृढ हत्ती कमलापुरातील कॅम्पमध्येच राहतील. मात्र त्यांच्या आयुष्यभर पोषणाची, आरोग्याची जबाबदारी ट्रस्ट घेईल, असे केंद्राने मंजुरी देताना म्हटले आहे. कमलापुरात ठेवल्या जाणाऱ्या हत्तींच्या सुविधांच्या निर्मितीचा सर्व तसेच दैनंदिन खर्चही ट्रस्टकडून करण्याचे मान्य करण्यात आले आहे. यातून स्थानिकांना आणि गावकऱ्यांना रोजगाराच्या संधी होतील, असे केंद्राने स्पष्ट केले.

असा झाला होता विरोध

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींच्या स्थानांतरणाला बराच विरोध होता. येथे ११ हत्ती होते, त्यापैकी सध्या ८ जीवित आहेत. सुरुवातीच्या घडामोडीत हे हत्ती पेंच प्रकल्पात पाठविण्याचे ठरले होते. मात्र गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री अंब्रीशराव महाराज यांनी विरोध केल्यावर हा मुद्दा मागे पडला. त्यानंतर जामनगरला पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. शासकीय कॅम्पमधील हत्ती मुकेश अंबानी यांच्या खासगी प्राणिसंग्रहालयाला देत असल्यावरून स्थानिकांचा बराच विरोध होता. वन्यजीव प्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनी पर्यटनाचा मुद्दा उपस्थित करून विरोध दर्शविला होता. मनसेसह अन्य राजकीय पक्षांनीही पत्रव्यवहार केला होता.
 

Web Title: Video: Congress angry ... Elephants from Maharashtra run away in Ambani's new park in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.