Video : "हा अमोल मिटकरीचा गैरसमज आहे"; व्हिडिओ पाहून सुप्रिया सुळे भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 03:18 PM2023-10-07T15:18:01+5:302023-10-07T15:26:03+5:30
वाशिममध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात अमोल मिटकरी म्हणाले की, खूप कमी भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी असतात असे सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या होत्या
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटातील काही नेते एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात. त्यात, शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका आक्रमक असते. तर, अजित पवार गटाकडून आमदार अमोल मिटकरी जशास तसे उत्तर देताना दिसून येतात. अमोल मिटकरींनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंना टोला लगावला होता. तसेच, अजित पवार भाऊ म्हणून कायमच त्यांच्या पाठिशी राहिले, असेच त्यांनी सूचवले होते. त्यावर, आता खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
वाशिममध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात अमोल मिटकरी म्हणाले की, खूप कमी भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी असतात असे सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या होत्या. त्यांच्या या भाषणाशी मी सहमत आहे. अजित दादा तन-मन-धनाने काम करतात म्हणून सुप्रिया ताई मागील अनेक वर्षापासून बारामतीतून निवडून येत आहेत, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. तसेच, आम्ही पुरोगामीपणा सोडला नाही, अशी टीकाही त्यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली होती. आम्ही भाजपसोबत गेलो पण आम्ही पुरोगामीपणा सोडला नाही, असे ते म्हणाले.
सुप्रिया सुळेंनी आमदार अमोल मिटकरींचा ह्या भाषणाचा व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये, ते तन-मन-धनाने असा शब्दप्रयोग करतात. त्यावर, सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीने तन-मन लावून नेहमीच लढाई लढलीय. पण, धनाचं राजकारण कधी केलं नाही, आणि कधी आम्ही करणारही नाही. हा अमोल मिटकरीचा गैरसमज आहे की, आम्ही धनाने इलेक्शन लढतो, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी आमदार अमोल मिटकरींनी फटकारलं.
मला त्यांचं माहिती नाही, पण महाराष्ट्राच्या माय-बाप जनेतला मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की, अजित दादांनी आणि मी तन व मनाने सगळी इलेक्शन लढली आहेत. पण, आम्ही दोघांनीही धनाने कधीही इलेक्शन लढली नाहीत. मी अमोल मिटकरींना विनंती करते की, धन आणि इलेक्शन, आणि राष्ट्रवादी व पवार कुटुंबीय यात गल्लत करू नका, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी मिटकरींना लक्ष्य केलं.