शिंदे आणि उद्धवसेनेत व्हिडिओ युद्ध सोशल मीडीयावर नेटीझन्सही भिडले
By मनीषा म्हात्रे | Published: April 25, 2024 08:00 PM2024-04-25T20:00:30+5:302024-04-25T20:01:09+5:30
मुंबईतील निवडणुकीच्या टप्प्याला कमी कालावधी राहिला असताना मविआ - महायुतीतील ही लढत येत्या काळात अधिक गडद होताना दिसणार आहे.
मुंबई- यंदाची लोकसभा निवडणुक अत्यंत आव्हानात्मक आहे, त्यात मुंबई दक्षिण मतदारसंघातील लढाई ही अत्यंत चुरशीची मानली जाते. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरीही आता शिंदेसेना आणि उद्धवसेनेत सोशल मीडीयावर 'व्हिडिओ युद्ध' रंगले आहे. शिंदेसेनेचे मिलिंद देवरा यांनी बुधवारी सोशल मीडीयावर आपण यांना पाहिलत का? या शीर्षकांतर्गत उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत मतदारसंघातून बेपत्ता असून मतदार त्यांना ओळखत नसल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओ आता उत्तर देत उद्धवसेनेकडूनही नवा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या या व्हिडिओ युद्धात सोशल मीडीयावर दोन्ही बाजूचे नेटीझन्सही चांगलेच भिडताना दिसत आहेत. उद्धवसेनेने पोस्ट केलेल्या व्हिडिओत विरोधकांचा व्हिडिओ शूट करण्यात आलेल्या त्याच जागांना भेट देत मतदारांशी संवाद साधण्यात आला आहे. व्हिडिओमधील मतदार खासदार अरविंद सावंत यांना आम्ही ओळखत असल्याचे सांगत त्यांनी मतदारसंघात ही कामे पूर्ण केल्याचा उल्लेख देखील केला आहे. याखेरीज, व्हिडिओमधील निवेदक अखेरीस दक्षिण मुंबईत निर्धार, अरविंद सावंतच खासदार असे देखील अधोरेखित करताना दिसत आहे.
एकीकडे महायुतीला उमेदवारच नसल्याने संभ्रमावस्थेत असलेल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना वेगाने हा व्हिडिओ व्हायरल करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे सावंत यांच्या पदाधिकारी आणि युवा सेनेच्या ब्रिगेडकडून थेट सभा, बैठकांच्या जागी हा व्हिडिओ प्रसारित करण्यासही सांगण्यात आल्याची माहिती उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील निवडणुकीच्या टप्प्याला कमी कालावधी राहिला असताना मविआ - महायुतीतील ही लढत येत्या काळात अधिक गडद होताना दिसणार आहे.