Vidhan Parishad Election: काँग्रेसनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 04:41 PM2022-06-17T16:41:42+5:302022-06-17T16:42:48+5:30

महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदानाआधीच अपशकुनाला सामोरं जावं लागले आहे असं शेलारांनी म्हटलं आहे.

Vidhan Parishad Election: Congress stabbed Shiv Sena in the back; BJP leader Ashish Shelar claims | Vidhan Parishad Election: काँग्रेसनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

Vidhan Parishad Election: काँग्रेसनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

Next

मुंबई - राज्यसभेच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे धाकधूक निर्माण झाली आहे. कारण या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेनेकडून २, काँग्रेसकडून २ आणि राष्ट्रवादीकडून २ उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीत जिंकण्यासाठी २७ मतांचा कोटा लागेल. त्यात अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आव्हान निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसलाही दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी इतर मतांची जुळणी करावी लागणार आहे. 

यावर भाजपा नेते आशिष शेलार(BJP Ashish Shelar) म्हणाले की, पक्षाच्या आमदारांवर भरवसा ठेवायचा की नाही हा महाविकास आघाडीच्या पक्षांचा अंतर्गत विषय आहे. महाविकास आघाडीत एकमेकांच्या पक्षांविरोधातच भय आहे. त्यामुळे निवडणुकीचा सामना करण्याची  हिंमत तो पक्ष दाखवू शकत नाहीत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आत्मविश्वास गमावला आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलं. शिवसेनेने MIM आणि समाजवादी पक्षाची मते घेतली. राष्ट्रवादीची अतिरिक्त मते पडली नाहीत असा शिवसेनेचा दावा आहे. एकमेकांमध्ये हेराफेरी करण्याचं काम हे तिन्ही पक्ष करत आहेत असा टोला लगावला आहे. 

त्याचसोबत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदानाआधीच अपशकुनाला सामोरं जावं लागले आहे. मविआसाठी नकारघंटा वाजायला लागली आहे. भाजपाच्या विजयाचे शुभसंकेत असल्याचे वारे हायकोर्टाच्या निकालाने वाहू लागलेत अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिले आहेत. कोर्टाच्या निकालावर आरोप करणाऱ्या संविधानाच्या कक्षा ओलांडून बोलू नये. प्रताप सरनाईक प्रकरणात काय झालं? न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणं हे राजकीय अपरिपक्वतेचं लक्षण आहे. संजय राऊत हे याचे महामेरू आहे असा चिमटा शेलारांनी राऊतांना काढला आहे. 

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत ११ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांना निवडून आणण्यासाठी २७ मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे. त्यात भाजपाकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप, राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे आणि शिवसेनेकडून सचिन आहिर, आमश्या पटेल यांनी उमेदवारी दाखल केली आहे. राज्यसभा निकालात संख्याबळ नसताना भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणल्याने आता विधान परिषदेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

Web Title: Vidhan Parishad Election: Congress stabbed Shiv Sena in the back; BJP leader Ashish Shelar claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.